पंढरपूर- आयट्रिपलई, मुंबई सेक्शन स्टुडंट अॅक्टीव्हिटी आणि आयट्रिपलई स्टुडंट ब्रँच, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ एप्रिल २०२५ रोजी स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीन विभागांच्या वतीने ‘टेक्नोव्हेशन २ के२५’ हा उपक्रम तसेच रिझनल आणि ग्रँड फिनाले राउंड संपन्न झाला.
यामध्ये आय ट्रिपलई, मुंबईचे चेअरमन आनंद घारपुरे हे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस)च्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार ह्या होत्या. दीपप्रज्वलनानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.सुमंत आनंद यांनी विभागाची माहिती व वाटचाल तसेच संशोधनासाठी मिळालेला निधी, मिळालेली मानांकने आदी बाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती यांनी या कार्यक्रमाचे स्वरूप, सहभागी विद्यार्थी व प्रोजेक्ट एक्झिबीशन बाबत माहिती दिली. यावेळी आयट्रिपलई, मुंबईचे चेअरमन घारपुरे म्हणाले की, ‘ग्रामीण भागात असणाऱ्या गोपाळपूर मधील शिक्षण आणि डॉ.रोंगे सरांचे दिशादर्शक नियोजन यांचे कौतुक वाटते कारण येथील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच संशोधन करत असतो, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रत्येक दोन-तीन वर्षात तंत्रज्ञानात बदल होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत बारकाईने अभ्यास करून संशोधन करणे गरजेचे आहे. तुमच्या प्रोजेक्टचे रुपांतर प्रोडक्ट मध्ये करा. भारताची लोकसंख्या लक्षात घेता भारतामध्ये बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांची गरज लक्षात घेऊन उत्पादने तयार करणे गरजेचे आहे.’ असे सांगितले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की, ‘स्पर्धेत जिंकून पारितोषक मिळविण्यापेक्षा स्पर्धेत व स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे आपला 'आत्मविश्वास वाढतो’ असे सांगून विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. आयट्रिपलई चे सदस्य दत्तात्रय सावंत म्हणाले की, ‘आयट्रिपलई च्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व त्या अंतर्गत असणाऱ्या विविध संधींचा सुयोग्य वापर आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी करावा.’ अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार म्हणाल्या की, ‘विजेत्यांनी हुरळून जायचे नाही आणि ज्यांचा स्पर्धेत नंबर आला नाही त्यांनी अधिक जोमाने व उत्साहाने पुढील स्पर्धेत सहभागी होवून आव्हान द्यायचे. यातून आपल्याला अनुभव येतो व अभ्यास अधिक होतो.’ असे सांगितले. सायंकाळी या उपक्रमाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये राज्यातील विविध महाविद्यालयांतील जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी ९० प्रकल्प सादर केले होते. यामध्ये विजेत्यांना रोख पारितोषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून डॉ. रोशन मक्कर, लक्ष्मी घारपुरे, सुमित बुब, चैत्राली पंढरपूरे, हेमंत इंगळे, राजेंद्र सावंत व अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एस. एस. गावडे व इतर शिक्षक तसेच आयट्रिपलई विद्यार्थी प्रतिनिधी गौरी कुबेर, जय गाडेकर, ऋतुराज कोरे, स्नेहा पिसे, वैष्णवी कदम पाटील यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.एस.पी.पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.बादलकुमार, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ. डी. ए. तंबोळी, तसेच तिन्ही विभागांचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ.नीता कुलकर्णी व डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
0 Comments