LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आषाढी वारीसाठी प्रशासनाने केलेल्या सुविधांची पाहणी



पंढरपूर, दिनांक 3(उमाका):- आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर, मंदिर परिसर, दर्शन रांग (पत्रा शेड), भक्ती सागर(65 एकर) या ठिकाणी वारकरी, भावीकांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. व  या कालावधीत सर्व पालखी सोहळ्या समवेत येणारे वारकरी, भाविकांना  कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत केलेल्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
  यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, मंदिर समितीचे कार्य अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्ती सागर (65 एकर) येथे प्रशासनाने वारकरी, भाविक यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी बुलेट वरून आले. येथील आपत्कालीन दक्षता व प्रतिसाद केंद्राला भेट देऊन तेथे आयसीयू मध्ये असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत आहे का याचीही त्यांनी खात्री केली. पोलीस विभागाने वारी कालावधीत ड्रोनद्वारे गर्दी व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्याने खरेदी केलेल्या ड्रोनची पाहणी करून उद्घाटनही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये, हिरकणी कक्ष, पाणीपुरवठा व्यवस्थाची ही पाहणी त्यांनी केली.
त्यानंतर वाळवंटात प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांची पाहणी केली व उजनी धरणातून भीमा नदी पात्रात येणारा पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवून वाळवंट वारकरी, भाविक यांच्यासाठी उपलब्ध राहील, याबाबत नियोजन करण्याचे त्यांनी सुचित केले. तसेच नदीपात्रात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही या अनुषंगाने काळजी घेण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देशित केले. तसेच पत्राशेड येथे असलेल्या दर्शन रांगेची पाहणी ही त्यांनी केली. तसेच दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून दर्शन रांगेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा विषयी माहिती, त्यांनी घेतली. 
  प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारी 2025 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी मार्ग, पंढरपूर शहर, भक्ती सागर, पत्रा शेड, वाखरी तळ येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संपूर्ण यात्रा कालावधीत पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. 
                    000000000

Post a Comment

0 Comments