पंढरपूर- आषाढी वारी चार दिवसावर आली असून ही वारी यशस्वी होण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. त्यालाच हातभार लावत स्वेरीने देखील आपली परंपरा पुढे चालू ठेवली असून आणि पंढरपूर प्रशासन आणि पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज गोपाळपूर चौकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
उच्चतंत्र शिक्षण क्षेत्रात ‘पंढरपूर पॅटर्न’ मुळे राज्यात वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वेरीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील प्रगतीच्या दिशेने नेत असताना सामाजिक बांधिलकीची नेहमीच जोपासना केली आहे. शिक्षणाबरोबरच विधायक व सामाजिक कार्यात देखील स्वेरी सातत्याने सहभाग नोंदवीत असते. वारीकाळात स्वेरीच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यामार्फत 'स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मलवारी, हरित वारी' अंतर्गत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता मोहीम राबविली गेली. सकाळी साडेसात वाजता गोपाळपूरच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.पुष्पा बनसोडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गोपाळपुरातील मंदिर परिसर, गोपाळपूर चौक, विठ्ठल- रुक्मिणी दर्शन रांग आदी ठिकाणी वारीपुर्व स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य हातात घेवून स्वेरीचे विद्यार्थी प्राध्यापक वर्ग व स्वेरी संस्थेचे पदाधिकारी हे सर्वजण स्वच्छता करत होते. यावेळी गोपाळपूरचे दिलीप गुरव म्हणाले की, ‘स्थापनेपासूनच स्वेरी नेहमी अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असते.’ स्वेरीचे नूतन सचिव प्रा. सुरज रोंगे याप्रसंगी म्हणाले की, ‘पंढरी नगरीत येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लागते त्यामुळे आपण भाग्यवान आहोत तसेच गोपाळपूर ग्रामपंचायत आणि येथील नागरिकांनी स्वेरीला सुरूवातीपासूनच सहकार्य केले आहे.’ या स्वच्छता अभियानाच्या उदघाटन प्रसंगी गोपाळपूरचे सरपंच प्रतिनिधी राजेंद्र बनसोडे, उपसरपंच बापूसाहेब लेंगरे, बापूसाहेब पडवळे, दिलीप गुरव, राहुल माने, समाजसेवक विक्रम आसबे, उदयसिंह पवार, ग्रामस्थ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे आदी यावेळी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. डी.एस. चौधरी, प्रा.अमोल चौंडे, फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.एच.बी.बनसोडे इतर प्राध्यापक व ‘राष्ट्रीय सेवा योजने’तील सुमारे ३०० विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments