पंढरपूर /प्रतिनिधी
उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेला महापूर आला आहे.
पावणे दोन लाख क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याने गुरुवारी पंढरपूर परिसरातील नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.
गुरुवारी चंद्रभागा नदीला निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी आमदार समाधान आवताडे यांनी केली.
यावेळी त्यांनी नदीकाठच्या असलेल्या व्यास नारायण आणि अंबिका नगर झोपडपट्टीतील महापुरामुळे उपजिल्हा रुग्णालयासमोरील भक्ती निवास येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या ३०० हून अधिक कुटुंबातील नागरिकांची भेट घेऊन स्थलांतरित कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन पूर परिस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने उजनी धरण क्षेत्रावरील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
पूर नियंत्रणासाठी पुणे व सातारा जिल्ह्यातील धरणा मधील अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे.
उजनी धरणातून आणि वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल होत असल्याने गुरुवारी चंद्रभागा दुथडी भरून वाहत असून नदीला महापूर आला आहे. यामुळे पुरातन विष्णुपद मंदिरासह नदीच्या पात्रातील सर्व संतांची मंदिरे तसेच गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेला आहे.
खबरदारी म्हणून प्रशासनाकडून नदीकाठीच्या व्यास नारायण आणि अंबिका नगर झोपडपट्टी परिसरातील ३०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
गुरुवारी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधाना आवताडे यांनी पंढरपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करून पूररेषेतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या तसेच स्थलांतरण केलेल्या कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या.
0 Comments