न्यु सातारा पॉलिटेक्निक, कोर्टी येथे जनरल सायन्स प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा यशस्वीपणे पार पडला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त व सर्वांगीण विकास याबाबत पालकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पालक मेळाव्यास पालक प्रतिनिधी म्हणून शैला खुटाळे व समाधान बागल हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. जा बिल इंडिया प्राइवेट लिमिटेड येथील एच.आर. मॅनेजर आकाश पाटील तसेच ब्रेन सीटर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील एच.आर. मॅनेजर माननीय किशोर वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी जनरल सायन्स प्रथम वर्षाचे विभागप्रमुख (HOD) बाळासाहेब ननवरे यांनी विद्यार्थ्यांचा वार्षिक प्रगती अहवाल सादर केला. या अहवालात विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, उपस्थिती, विविध उपक्रमांतील सहभाग व भविष्यातील नियोजन याची सविस्तर माहिती पालकांसमोर मांडण्यात आली. पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात प्राचार्य विक्रम लोंढे यांनी मनोगत व्यक्त करताना, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक व संस्था यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य व कौशल्य विकासावर भर द्यावा, असे त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच उपप्राचार्य विशाल बाड यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे आकाश पाटील व किशोर वाघ यांनी उद्योगजगतातील अपेक्षा, करिअरच्या संधी, तसेच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, संवाद कौशल्ये आणि तांत्रिक ज्ञान विकसित करण्याचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमास जनरल सायन्स प्रथम वर्षातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सपना दोडमिसे यांनी केले, तर इंद्रजीत जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
हा पालक मेळावा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालक, शिक्षक व उद्योगक्षेत्र यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणारा ठरला, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

0 Comments