मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिराच्या संवर्धन व विकासासाठी उजनी जल पर्यटन योजनेअंतर्गत ५ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रानंतर या प्रस्तावास गती मिळाली. जिल्हा नियोजन समितीने निधीस मान्यता दिली असून सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. वारसा संवर्धनाच्या दृष्टीने हा निर्णय धोरणात्मक मानला जात आहे.
मंदिराच्या संरक्षणासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) मुंबई मंडळाने सिव्हिल डिपॉझिट अंतर्गत सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. संरक्षित स्मारकांच्या जतनासाठी एएसआयची पूर्वपरवानगी आवश्यक असून, प्रस्तावित विकासामुळे संरक्षित क्षेत्रावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही याची खात्री केल्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते. मंजूर निधी एएसआयकडे जमा झाल्यानंतर नियमांनुसार संवर्धन व जीर्णोद्धाराची प्रक्रिया सुरू होणार आहे.
राज्य शासनाच्या विभागांनी विकासकामे हाती घ्यायची असल्यास एएमएएसआर कायद्याअंतर्गत सायन (पूर्व), मुंबई येथील प्रादेशिक संचालक (एएसआय) यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असल्याचे पत्रात नमूद आहे.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी मंदिरास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. देवस्थान समितीसोबत चर्चा करताना विकासकामांमध्ये दर्जा, पारदर्शकता आणि वेळेचे पालन यावर विशेष भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. आवश्यक अतिरिक्त कामांबाबतही सूचना करण्यास सांगितले.
या निर्णयामुळे माचनूरच्या ऐतिहासिक मंदिराच्या जतनाला गती मिळण्यासोबत धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. देवस्थान कमिटी व पंचक्रोशीतील नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली.

0 Comments