पंढरपूर- ‘बिल्डिंग भारत संपर्क–इनोव्हेशन बूट कॅम्प इन सिव्हील इंजिनिअरिंग’ या उपक्रमाअंतर्गत कानपूर (उत्तर प्रदेश)च्या आयआयटी या संस्थेत आयोजिलेल्या या स्पर्धेत स्वेरीच्या ‘शिलेदार्स’ या संघामधील विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले आहे. याबद्धल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कानपूर मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी या संस्थेत दि.०३ ते दि. ०५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ६ विद्यार्थ्यांच्या टीमने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही एक थीम आधारित स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील राहुल मारुती कवडे व सायली सिद्धनाथ कोरे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील ओंकार रणजीत मोरे व आदिती आबासाहेब चव्हाण तर कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील सुशांत धर्मेंद्र शेटे व ऋतुजा रामेश्वर राजमाने अशा तीन विभागांतील सहा स्पर्धक यामध्ये विजेते ठरले आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या पाच थीम होत्या. या स्पर्धेत भारतातून एकूण ६५ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील स्वेरीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता विशेष लक्षवेधी ठरली. ‘इनोव्हेशन इन एसेट मॅनेजमेंट’ या थीम साठी स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘वाहतुकीत प्रचंड गर्दी असताना त्यामध्ये रुग्णवाहिका अडकल्यास त्याला मार्ग मोकळा करण्यासाठी ‘गोल्डन मिनिट’ नामक विशेष प्रकल्प सादर केला होता. त्यामुळे स्वेरीचा ‘शिलेदार्स’ हा संघ विजेता ठरला. सहाही विजेत्या ‘शिलेदार्स’ना एकत्रितरित्या रोख पाच हजार रुपये व प्रत्येकाला स्वतंत्र प्रमाणपत्र देवून बूट कॅम्पचे समन्वयक सुधीर मिश्रा यांच्या हस्ते व संचालक रजनिश दास गुप्ता यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. निश्चित कालावधीत वास्तविक समस्येसाठी नाविन्यपूर्ण व्यवहार व विस्तार सक्षम उपाय विकसित करणे हा या स्पर्धेमागील उद्देश होता. आपल्या मर्यादा क्षमतेच्या बाहेर जावून विचार करण्याची क्षमता विकसित करणे, आधुनिक तंत्रज्ञान व अनुभव यांचा प्रभावी वापर करून उपक्रमांची मानसिकता विकसित करणे हा यामागील हेतू होता. यशस्वी विद्यार्थ्यांना तिन्ही विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ.सुरज रोंगे, विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, मार्गदर्शक डॉ. माणिक देशमुख, संशोधन अधिष्ठाता, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments