सोलापूर : बाळे येथील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर या तीर्थक्षेत्राला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक मा. समाधान भाऊ आवळे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला असून, हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
महत्त्वाची बाब म्हणजे, सदर प्रस्ताव देवस्थान पंच कमिटी व ट्रस्टी मंडळ यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी महापालिकेकडे दाखल केला होता. त्यानंतर पाठपुरावा करून हा विषय सभेपुढे आणण्यात आला आणि अखेर त्यास मंजुरी मिळाली.
तसेच आयुक्त यांच्या दि. १०/०३/२०२६ रोजीच्या मान्यतेनुसार, या प्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील काही बाबी प्रलंबित असल्यास त्या पूर्ण करणे, तसेच सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय घेऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे बाळे येथील श्रीक्षेत्र खंडोबा मंदिराचा विकास अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर येथे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशयोजना तसेच पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, वर्षभर येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची वर्दळ असते. विशेषतः यात्रा व उत्सव काळात हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. त्यामुळे या ठिकाणाच्या पर्यटन विकासाची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती.
नगरसेवक मा. समाधान भाऊ आवळे यांच्या पुढाकारामुळे या प्रस्तावाला गती मिळाली असून, स्थानिक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात बाळे हे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निर्णयाबद्दल नगरसेवक आवळे तसेच देवस्थान पंच कमिटी व ट्रस्टी मंडळ यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.*

0 Comments