पंढरपूर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात अलीकडे करण्यात आलेल्या बदलांमध्ये इतिहास विषयातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज पंढरपूर येथे उपविभागीय अधिकारी (प्रांत साहेब) सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले.
महासंघाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्य हा केवळ ऐतिहासिक विषय नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय अस्मितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार विद्यार्थ्यांना नकाशाच्या माध्यमातून स्पष्टपणे समजणे आवश्यक आहे. मात्र, काही इयत्तांमधून हा नकाशा वगळण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या आकलनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता महासंघाने व्यक्त केली आहे.
या निवेदनाद्वारे महासंघाने पुढील प्रमुख मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत:
1) शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत व स्पष्ट स्वरूपात पुन्हा समाविष्ट करावा.
2) डिजिटल माध्यमांद्वारे (QR कोड / ई-सामग्री) नकाशाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी.
3) या विषयावर तज्ज्ञ समिती स्थापन करून अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करावे.
प्रांत साहेब यांनी निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष- अर्जुनराव चव्हाण, शिवाजीराव मोरे, हनुमंत कदम, सचिन गंगथडे,वैभव चव्हाण, सुहास निंबाळकर, संतोष जाधव, अमोल पवार, नानासो शिंदे, अमर शिंदे, शुभम ताटे, काका यादव, पांडुरंग शिंदे, शामराव साळुंखे, नागेश गायकवाड, सौ. प्रभावती गायकवाड, रतन थोरवत, बालाजी शिंदे, शरण साळुंखे, दिपक कोठावळे, दीपक गोरे, सुमित गाजरे,प्रज्वल घाडगे, मालोजी शेंबडे, अनिल उकरंडे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments