पंढरपूर- शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर नाव असलेल्या मुंबई येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' (आयसीटी) आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार (एमओयु) संपन्न झाला. या सामंजस्य करारामुळे ग्रामीण भागातील औषधनिर्माणशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना नविन संशोधनास वाव मिळणार आहे.
या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश हा संशोधन आणि विद्यार्थी विकासावर भर देणे हा असून औषधनिर्माणशास्त्रातील नाविन्यपूर्ण संशोधन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि प्राध्यापकांसाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे हा आहे. या संयुक्त भागीदारीमुळे दोन्ही संस्थांमधील संशोधक एकत्र येऊन नवीन औषध प्रणाली आणि आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर काम करू शकणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत या महत्वपूर्ण कराराच्या कागदपत्रावर आयसीटी मुंबईचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डॉ. पी. के. खुळे आणि डॉ. व्ही. व्ही. मोरे यांनी स्वाक्षरी केल्या. या करारामुळे आयसीटीमधील प्रगत प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञान स्वेरीच्या विद्यार्थ्यांसाठी खुले होईल.’ कराराचे मुख्य फायदे म्हणजे संशोधन उपक्रमात औषधनिर्माण क्षेत्रातील प्रगत संशोधनासाठी दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करतील. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, गेस्ट लेक्चर्स आणि प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष कार्याचा अनुभव घेता येईल. या करारानुसार प्राध्यापकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातील, ज्यामुळे अध्यापन आणि संशोधन पद्धतींमध्ये अधिक सुधारणा होईल. स्वेरीचे सचिव डॉ. सूरज रोंगे यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, ‘आयसीटी सारख्या नामांकित संस्थेशी जोडले जाणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. याचा सर्वाधिक फायदा आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये आणि उच्च शिक्षणात होईल.’ या करारामुळे पंढरपूरसारख्या ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार असून, औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधनाला नवीन दिशा मिळणार आहे. या सामंजस्य कराराचे हस्तांतरण आयसीटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. श्रीरंग जोशी यांनी केले असून, यावेळी प्रा. डॉ. शिरीषकुमार आंबवडे हे उपस्थित होते. या यशस्वी कराराबद्धल संस्थेचे संस्थापक डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी या सामंजस्य कराराचे स्वागत केले आहे.

0 Comments