न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या निवड झालेल्या 67 विद्यार्थ्यांची जाबील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत निवड झाली असून, भरती प्रक्रिया सुरू झाल्याने संस्थेमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि प्रशिक्षण व्यवस्थेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले असून भविष्यातही त्यांनी उच्च ध्येय गाठावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना सांगितले की, तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यावर कॉलेजचा भर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळत असून ही बाब संस्थेसाठी अभिमानास्पद आहे.
ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या या संधीचे सोन करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी कंपनीत प्रामाणिकपणे काम करून स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी आणि संस्थेचे नाव उज्ज्वल करावे. तसेच भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट विभाग सतत प्रयत्नशील राहील.
यावेळी कॉलेजच्या विविध विभागप्रमुख तसेच शिक्षकांनीही निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून न्यू सातारा पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक व प्लेसमेंट कार्याचा लौकिक अधिक वाढला आहे.

0 Comments