पंढरपूर, दि. 08: श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पंढरपूर या संस्थेच्या संचालक मंडळाची विशेष सभा सोमवार दि. 08 जून रोजी सकाळी 11.00 वाजता तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर यांच्या कार्यालयात संपन्न झाली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी एस. टी. तेलंगरे, अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर हे उपस्थित होते.
सभेस संस्थेचे संचालक बलभिम पावले, चंद्रकांत कोळी, तुकाराम कुलकर्णी, राजेंद्र सुभेदार, पांडूरंग कोले, सुनंदा देवकते, पांडूरंग बुरांडे, नारायण देवकुळे, सविता रणदिवे तसेच संस्थेचे सचिव श्री. सुरज सुधाकर तेली व सुशिलकुमार ढेकळे पाटील उपस्थित होते.
संस्थेचे विद्यमान चेअरमन बलभिम राजाराम पावले व व्हाईस चेअरमन चंद्रकांत धर्माण्णा कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांच्या निवडीसाठी ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. चेअरमन पदासाठी नारायण मच्छिंद्र देवकुळे यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी सविता संजय रणदिवे यांचा अर्ज प्राप्त झाला. दोन्ही पदांसाठी अन्य कोणताही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने अध्यासी अधिकारी एस. टी. तेलंगरे यांनी श्री. नारायण मच्छिंद्र देवकुळे यांची चेअरमनपदी तसेच सविता संजय रणदिवे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
निवड जाहीर होताच उपस्थित संचालक व सभासदांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नूतन चेअरमन नारायण देवकुळे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी, सभासदांच्या हितासाठी आणि पतसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच नूतन व्हाईस चेअरमन सविता रणदिवे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवडीबद्दल मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पतसंस्थेचे सभासद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments