पंढरपूर -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून प्राप्त निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर आणि लायन्स क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये नेत्रदान दिनाचे औचित्य साधून नुकतेच 'नेत्रदान जनजागृती' व 'नेत्रतपासणी शिबिर' घेण्यात आले. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ओल्ड टीपीओ हॉलमध्ये उत्साहात पार पडला. स्वेरीचे संस्थापक व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दीपप्रज्वलनानंतर महाराष्ट्र गीत व राष्ट्रीय सेवा योजननेच्या गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे यांनी स्वेरीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात पंढरपूर विभागीय राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. संजय मुजमुले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे स्पष्ट केली तर स्वेरीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी नेत्रदानाचे महत्त्व, त्याची सामाजिक गरज आणि मानवतेसाठी असलेले योगदान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गौरी नेत्रालयचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. किरण बहिरवाडे, भंडीशेगावचे सरपंच, उद्योजक व समाजसेवक गणेश पाटील तसेच सुहासिनी दुग्धालयचे शशिकांत कराळे यांनी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देत समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. एका नेत्रदात्यामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, असे सांगून त्यांनी नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी उपस्थितांना प्रेररीत केले. या कार्यक्रमास स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर, स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर, स्वेरीज पॉलिटेक्निक पंढरपूर, आयसीएमएस कॉलेज कासेगाव, उमा महाविद्यालय पंढरपूर, श्रीकृष्ण महाविद्यालय चळे, दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय मंगळवेढा, यशवंत भाऊ पाटील महाविद्यालय भोसे (ता. पंढरपूर), न्यू सातारा़ बीसीए महाविद्यालय, कोर्टी तसेच पंढरपूर विभागातील विविध शाळा व महाविद्यालयांतील जवळपास १५३ राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या सकारात्मक परिणामस्वरूप २१ स्वयंसेवकांनी व शिक्षकांनी नेत्रदान प्रतिज्ञापत्र भरून नेत्रदानाचा संकल्प केला तसेच शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची प्राथमिक नेत्रतपासणी करण्यात आली व त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, डॉक्टर, लायन्स क्लबचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व स्वयंसेवक यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित मित्र गुरुजी महाविद्यालय, मंगळवेढा येथील प्रा. पल्लवी भोजने यांनी केले आणि सर्वांचे आभार मानले.

0 Comments