सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी, ग्रामीण नागरिक, घरकुल लाभार्थी, भाविक आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकरी व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन मा. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना विविध विषयांवरील निवेदने सादर केली. संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ वितरित करावी, अशी मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील गट क्रमांक २८० व ४८४ या गायरान जमिनीबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करून संबंधित ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी आवाज उठवत गोकुळ शुगर कारखान्याकडील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले पुढील १५ दिवसांत अदा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या कष्टाचे पैसे वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ओढ्यांवर पूल बांधण्यासाठी सर्वेक्षण करून आवश्यक प्रस्ताव तयार करावेत व निधीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गाव भीमा नदीच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी गंभीर समस्यांना सामोरे जात असल्याने गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.
धार्मिक पर्यटन आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने मोहोळ तालुक्यातील वाळूज (देगाव) येथील श्री नागनाथ मंदिरास तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसराच्या विकासाला गती मिळून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी आवश्यक वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाळूअभावी अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
पंढरपूर तालुक्यातील पोहरगाव येथील रेशन दुकानात इष्टांक उपलब्ध असूनही लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींची चौकशी करून पात्र रेशनकार्डधारकांना धान्य वितरण सुनिश्चित करावे, अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
मोहोळ तालुक्यातील रानमसले येथे JSW Solar प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक वहिवाटीच्या रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केल्याने, शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे ये-जा करण्यासाठी रस्ता खुला करून देण्याचे निर्देश संबंधित कंपनीला देण्यात यावेत, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.
याशिवाय, सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घरकुलासाठी जागेचा प्रश्न गंभीर बनला असल्याने गावालगत उपलब्ध गायरान जमिनींचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे विशेष प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यावेळी मा. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व निवेदनांची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांकडून वस्तुनिष्ठ पडताळणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील तसेच प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन दिले.
खासदार प्रणिती शिंदे यांनी सादर केलेल्या या विविध निवेदनांमधून शेतकरी, ग्रामीण नागरिक, घरकुल लाभार्थी, रेशनकार्डधारक आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबत त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्याचे दिसून येत असून, संबंधित विभागांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments