शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांचा गौरव करताना संस्थेला विशेष आनंद होत असतो. याच भावनेतून आज न्यु सातारा कॉलेजच्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले. स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. या समारंभात कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे यांना 'आदर्श प्राचार्य' पुरस्काराने, क्रीडा शिक्षक गणेश पडवळकर यांना 'आदर्श क्रीडाशिक्षक' पुरस्काराने, तर न्यु सातारा बीसीए कॉलेजचे उपप्राचार्य प्रवीण ताटे यांना 'आदर्श शिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पुरी यांनी केले. यावेळी उपस्थित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात या तिन्ही मान्यवरांचे अभिनंदन केले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य विक्रम लोंढे म्हणाले, "हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण न्यु सातारा कॉलेज परिवाराचा आहे. शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच संस्थेला हा नावलौकिक मिळवता आला. स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांनी हा पुरस्कार देऊन गौरव केला, याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. भविष्यातही विद्यार्थीहिताला प्राधान्य देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असेल."
तर उपप्राचार्य प्रवीण ताटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, "शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीतच खरे समाधान मिळते. हा पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी अधिक वाढली असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार व मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे. स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर आणि संस्थेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे."
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम यांनीही पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे पुन्हा एकदा अभिनंदन करत, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी अर्जुन इंगोले सर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे कॉलेज परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

0 Comments