LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीचा मृदा परीक्षण प्रयोगशाळेसाठी सुशीलानंद अॅग्रो पॉलीक्लिनिक सोबत सामंजस्य करार




पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इस्लामपूर येथील सुशीलानंद अॅग्रो पॉलिक्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या परिसरात मृदा परीक्षण प्रयोगशाळा स्थापन व विकसित करण्यासाठी अलीकडेच सामंजस्य करार (एमओयु) करण्यात आला.
        स्वेरीच्या स्थापनेपासून ग्रामीण विकास, संशोधन, तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजोपयोगी उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, जमिनीची सुपीकता व गुणवत्तेचे वैज्ञानिक विश्लेषण करणे तसेच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने या मृदा परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या सामंजस्य करारानुसार सुशीलानंद अॅग्रो पॉलीक्लिनिकच्या वतीने प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेची कार्यपद्धती व प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करणे, प्रयोगशाळा व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता हमी, मृदा नमुन्यांचे विश्लेषण, उपकरणांचे कॅलिब्रेशन तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सुशीलानंद अॅग्रो पॉलिक्लिनिकचे लॅब इनचार्ज दीपक आनंद कापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीच्या नियुक्त तांत्रिक कर्मचार्‍यांना प्रयोगशाळेचे स्वतंत्रपणे संचालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच कराराच्या नियोजित कालावधीत दर आठवड्याला प्रयोगशाळेला भेट देऊन तांत्रिक मार्गदर्शन, चाचणी प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण आणि अडचणींचे निराकरण यासाठी सहकार्य केले जाणार आहे. स्वेरीच्या वतीने प्रयोगशाळेसाठी आवश्यक उपकरणे, रसायने, काचेची साधने, फर्निचर व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सल्लागार सेवेसाठी एका वर्षाच्या कालावधीसाठी रु. ३ लाख ६० हजार इतके मानधन निश्चित करण्यात आले असून, करारानुसार मृदा नमुन्यांच्या विश्लेषणाचे कार्य पूर्ण करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी आवश्यक काचसामग्री, रासायनिक द्रव्ये व इतर प्रयोगशाळा साहित्याच्या खरेदीसाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना माती परीक्षणाची शास्त्रीय व विश्वासार्ह सुविधा उपलब्ध होणार असून, मातीतील विविध घटकांचे विश्लेषण करून पिकांसाठी आवश्यक खत व्यवस्थापनाबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उत्पादनक्षमता वाढविण्यासोबतच अनावश्यक खतांचा वापर कमी होऊन शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळणार आहे. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विविध तंत्रज्ञानाधारित उपक्रम राबविले जात आहेत. मृदा परीक्षण प्रयोगशाळा हा त्याच दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण टप्पा असून, शिक्षण, संशोधन आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान यांची सांगड घालण्यास या उपक्रमामुळे मदत होणार आहे. या प्रसंगी सुशीलानंद अॅग्रो पॉलीक्लिनिकचे लॅब इनचार्ज दीपक आनंद कापूरकर, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, करार प्रसंगी प्रा. निकिता माळी, डॉ. सुप्रवा घोष, आरएचआरडीएफ चे समन्वयक डॉ. रुपाली काटकर, प्रा.साधना भापकर, प्रा.अमिषा कश्यप तसेच संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. संदीप पांडे यांच्यासह इतर संशोधक प्राध्यापक उपस्थित होते. या सामंजस्य करारामुळे स्वेरी आणि सुशीलानंद अॅग्रो पॉलिक्लिनिक यांच्यातील तांत्रिक सहकार्य अधिक दृढ होऊन मृदा परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. या सामंजस्य कराराचे  संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ यांच्यासह सर्वांनी स्वागत केले आहे.

चौकट– शेतकऱ्यांना शास्त्रीय मृदा परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत शाश्वत व आधुनिक शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने स्वेरीमध्ये मृदा परीक्षण प्रयोगशाळा विकसित करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments