LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *वक्त बदलने वाला है; २०२९ मध्ये लोकशाहीचा विजय होईल, विजय आपलाच होईल” – खासदार प्रणितीताई शिंदे*👉 *डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून परिवर्तनाची नवी क्रांती घडेल; काँग्रेसच्या विचारसरणीवर ठाम राहून संघर्ष करण्याचे आवाहन*मुंबई – ०१ ऑक्टोबर २०२६


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी मुंबईतील टिळक भवन येथे पदभार स्वीकारल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी, शहर व जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष तसेच आमदार-खासदारांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या संघटनात्मक वाटचालीसह आगामी काळातील पक्षाच्या भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, AICC सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, CWC सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार प्रणितीताई शिंदे, विश्वजित कदम, नसीम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह महाराष्ट्रातील आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, शहर व जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

तसेच यावेळी सोलापुरातून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, प्रदेश सचिव राहुल वर्धा, श्रीशैल रणधीरे, काँग्रेसचे मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला उपस्थित होते.

डॉ. प्रसाद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संघटन मजबूत करण्यावर आणि शेतकरी, कामगार, दलित, अल्पसंख्याक व युवकांच्या प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन केले. 

यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, वक्त बदलने वाला है. आज या बैठकीला आलेले सर्वजण संघर्ष करून येथे पोहोचले आहेत. अनेक संकटे आली, साम-दाम-दंड-भेदाचा वापर करण्यात आला; मात्र या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, काँग्रेसची विचारसरणी सोडली नाही आणि आपली तत्त्वेही सोडली नाहीत. त्यामुळे या सर्वांचे अभिनंदन. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि काँग्रेसची विचारसरणी ही केवळ राजकीय विचारसरणी नाही, तर माणूस आणि समाज घडविणारी मूल्यव्यवस्था आहे. आज समाजात आपली ओळख निर्माण झाली असेल तर त्यामागे काँग्रेसच्या विचारसरणीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या विचारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रणितीताई शिंदे यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, ही लढाई केवळ सत्तेची नाही, तर तत्त्वांची आणि विचारसरणीची लढाई आहे. राहुलजी गांधी ही लढाई लढत आहेत. आता हा संघर्ष रस्त्यावर आणण्याची गरज आहे. आपण आतापर्यंत संघर्ष केला आहे; आता आणखी थोडा संघर्ष करण्याची गरज आहे. २०२९ मध्ये लोकशाहीचा विजय होईल आणि आपलाच विजय होईल.

जंतर-मंतरपासून राहुलजी गांधी यांच्या आंदोलनामुळे देशातील जनतेला लोकशाहीच्या ताकदीची जाणीव होत आहे. लोकशाहीसमोर मोठमोठ्यांनाही झुकावे लागते. या संघर्षात पहिली विकेट गेली आहे; दुसरी आणि तिसरीही काँग्रेसच्या लढ्यामुळे लवकरच जाईल, असा विश्वासही प्रणितीताई शिंदे यांनी व्यक्त केला.

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून परिवर्तनाची नवी क्रांती घडेल, याची आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्रातून देशात परिवर्तनाची सुरुवात होईल, असेही खासदार प्रणितीताई शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments