पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित फार्मसी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह-२०२६ चे औचित्य साधून 'स्वस्थ भारत: प्रतिजैविक प्रतिरोधावर मात (अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स)' या राष्ट्रीय महत्त्वाच्या संकल्पनेवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहात एकूण १७ विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. सध्याच्या काळात प्रतिजैविकांचा अतिवापर आणि चुकीच्या वापरामुळे निर्माण झालेला प्रतिजैविक प्रतिरोध हा गंभीर सार्वजनिक आरोग्य धोका बनला असून या धोक्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात जनजागृती करणे, औषधांचा योग्य वापर आणि औषधनिर्मात्याची आरोग्य सेवेतील जबाबदार भूमिका अधोरेखित करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश होता. या सप्ताहात रांगोळी स्पर्धा, मार्गिका सजावट स्पर्धा, लघुचित्रमालिका निर्मिती स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वस्तुसंग्रहालय तयारी, दोरीउड्या स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, १०० मीटर धावण्याची शर्यत, ४ बाय १०० मीटर रिले शर्यत, प्रश्नमंजुषा, भित्तीपत्रक सादरीकरण आणि खजिना शोध अशा एकूण १७ स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. प्रश्नमंजुषा, भित्तीपत्रक सादरीकरण, वादविवाद आणि वस्तुसंग्रहालय तयारी या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून संशोधन, सादरीकरण आणि तर्कशुद्ध विचार करण्याचे कौशल्य विकसित झाले. रांगोळी, चित्रकला, मेंदी, मार्गिका सजावट आणि लघुचित्रमालिका निर्मिती सारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळून औषध जनजागृतीचा संदेश कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचवता आला. त्याचबरोबर पथनाट्य स्पर्धा ही समाजात थेट जाऊन औषधांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम असून यातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवाद कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होण्यास मदत झाली. दोरीउड्या, रस्सीखेच, धावणे आणि रिले शर्यत यांसारख्या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य सुधारण्याबरोबरच संघभावना, खिलाडूवृत्ती आणि एकता वाढीस लागली, तर खजिना शोध सारख्या खेळातून बुद्धिमत्ता आणि सांघिक कार्याचा कस लागला. सर्व विद्यार्थ्यांनी या १७ स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला. या सर्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आल्या असून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार सहभागी होण्याची संधी मिळाली. संस्थेचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक समन्वयकांच्या नियोजनाखाली हा उपक्रम पार पडला. या उपक्रमांमुळे केवळ औषधनिर्माण शिक्षणालाच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळून 'स्वस्थ भारत' चे ध्येय साध्य करण्यासाठी सक्षम औषधनिर्माते तयार होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0 Comments