न्यु सातारा कॉलेजमध्ये "३-दिवसीय हँड्स-ऑन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन वर्कशॉप" उत्साहात संपन्न झाले. तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
तीन दिवसांच्या या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी पायथॉन, एम्बेडेड सी, अरडुइनो, सेन्सर्स आणि मायक्रोकंट्रोलर्स यांची सखोल माहिती घेतली. रोबोटिक्स, ऑटोमेशन, प्रोग्रामिंग आणि कंट्रोल सिस्टिम्स या विषयांचाही सविस्तर परिचय करून देण्यात आला. कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे १००% हँड्स-ऑन शिक्षण. विद्यार्थ्यांनी स्वतः एक मिनी रोबोटिक्स प्रकल्प तयार केला, त्यातील विविध घटक एकत्रित केले, त्याची चाचणी घेतली आणि शेवटी त्याचे सादरीकरण केले.
कार्यशाळेत एआय रोबोटिक्स इंजिनिअर्स श्री. सूरज बनसोडे आणि श्री. आकाश गवळी यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले. त्यांनी सोप्या भाषेत संकल्पना समजावून सांगत प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेतली.
या वेळी बोलताना प्राचार्य विक्रम लोंढे म्हणाले, "आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही; विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष काम करण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनसारख्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रकल्प तयार करून पाहिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. भविष्यातही अशा उद्योगाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यावर महाविद्यालयाचा भर राहील. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपले करिअर घडवावे."
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळे आणि नियोजनबद्ध आयोजनामुळे कार्यशाळा सुरळीत पार पडली.
कार्यशाळेच्या समारोपावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

0 Comments