त्या बालकाचा शोध न लागल्यास पुन्हा 6 डिसेंबर रोजी आंदोलन
पंढरपूर(प्रतिनिधी) ः
--------------------------------------------------------------------
एम.आय.डी.सी.परिसरातून चार वर्षीय बालकास पळवून नेल्याच्या घटनेला 10 दिवस उलटूनही तपास लागत नसल्याने जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकरभैय्या देशमुख यांनी रविवारी दामाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान या इशाराच्या पार्श्वभुमीवर मंगळवेढा पोलिस प्रशासनाने सदर गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने सुरू असून यासाठी विविध 9 पथके नेमली आहेत असे लेखी पत्र दिल्याने तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
दि.18 नोव्हेंबर रोजी सायं.6 वाजता एम.आय.डी.सी.परिसरातून मनोजकुमार साहू (वय 4) या बालकाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असून पोलिस यंत्रणा विविध अँगलच्या माध्यमातून तपास घेत आहे. मात्र दहा दिवसानंतरही त्याचा तपास लागला नसल्याने जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांनी त्या बालकाचा तपास तात्काळ लावावा अन्यथा रविवार दि.27 रोजी दामाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभुमीवर पोलिस प्रशासनाने जनहित शेतकरी संघटनेला लेखी पत्र दिले असून यामध्ये आमचा तपास 9 पथकाद्वारे योग्य दिशेने सुरू आहे. आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाकारता येत नाही त्याकरीता आपले जनआंदोलन थांबवून पोलिस दलास सहकार्य करावे असे पत्र दिले आहे. यावर जनहित शेतकरी संघटनेने दि.5 डिसेंबर पर्यंत या बालकाचा शोध न लागल्यास पुन्हा दि.6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा अल्टीमेट दिला आहे. हे निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक बापुसो पिंगळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहून स्विकारले. हे बालक परराज्यातील असले तरी ते भारत देशातील असल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा करून राज्यभर व तसेच राज्याच्या बाहेरही तपास यंत्रणा राबवून त्या बालकास सुखरूप शोधून काढावे अशी मागणीही देशमुख यांनी यावेळी करत पालकमंत्र्यांना या बालकाचा अद्यापही गांभीर्यता नसल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबियांना भेटू शकले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जनहित अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष उत्तम सरडे,जिल्हा संघटक सुरेश नवले,किशोर दत्तू,प्रविण खवतोडे,बाळासाहेब नागणे,दामाजी मोरे,नानासाो बिचुकले,दत्ता गायवाले,सर्जेराव गाडे,शिवाजी जाधव,बालाजी कदम,आण्णा कोळेकर,पृथ्वीराज भोसले,बंटी वराडे,सुखदेव डोरले,सुरेश जाधव,अमोल माळी,मारुती भोरकडे,रघुनाथ चव्हाण,गजानन तळेकर आदी उपस्थित होते.
चौकट -
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अद्यापही त्या अपहरणकर्त्या मुलाच्या कुटुंबियाची भेट घेतली नाही. येत्या दोन दिवसात त्यांची भेट घेवून सांत्वन करावे अन्यथा त्यांचा पुतळा दहन केला जाईल. पालकमंत्र्यानी येथील परिस्थितीची गंभीर दखल घेवून गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून राज्यभर व राज्याच्या बाहेर शोध मोहीम राबवून त्या बालकास शोधून काढावे.
-प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख, जनहित शेतकरी संघटना अध्यक्ष
------------
0 Comments