स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे अजनसोंड (ता. पंढरपूर) मध्ये दि.१० जानेवारी २०२६ ते दि.१६ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन दि. १० जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले. उदघाटन समारंभास अजनसोंडचे सरपंच रामचंद्र गोरख घाडगे, उपसरपंच बाळासो कांबळे, पोलीस पाटील सौ.मेघा समाधान घाडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शशिकांत पाटील तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या उदघाटन समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे तसेच पंढरपूर विभागाचे समन्वयक डॉ. संजय मुजमुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिबिराची सुरुवात श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी डॉ. राजेंद्र वडजे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना समाजसेवेचे महत्त्व विशद करताना ‘स्वयंशिस्त व राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका’ याबाबत विशेष मार्गदर्शन केले तसेच डॉ. संजय मुजमुले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रास्तविकात स्वेरीच्या रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे यांनी आठवडाभर चालणाऱ्या या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’ची सविस्तर रूपरेषा मांडत विविध सामाजिक, स्वच्छता, जनजागृती व ग्रामविकास उपक्रमांची माहिती दिली. गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’ चे कार्य सुरळीतपणे सुरु आहे. या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्रामविकास, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी व सेवाभाव निर्माण करण्याचा उद्देश साध्य केला जाणार आहे. यासाठी अजनसोंडच्या ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. डॉ. यशपाल खेडकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

0 Comments