पंढरपूर (प्रतिनिधी.) :: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास प्रारूप आराखड्याच्या प्रती दि. १२ ते १७नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूर येथील कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी, नगरपरिषद या चार कार्यालयात लोकप्रतिनिधी व नागरिक यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी संबंधितानी वरील चार कार्यालयातच सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी केले आहे.
अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक व पत्रकार यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. संबंधितांच्या मागणीनुसार सदर आराखड्याचे प्रारूप संबंधितांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. त्यानुसार सदर प्रारूप पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी येथील तुकाराम भवन मध्ये झालेल्या बैठकीत पंढरपूर शहरवासीयांनी आगामी मास्टर प्लॅन बाबत अतिशय तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त करून मागे केलेल्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अनेक सूचना मांडल्या,तर काही व्यापारी,नागरिकांनी या सगळ्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.यामुळे ही बैठक वादळी ठरली होती.


0 Comments