राज्यात सर्वच जिल्ह्यात बऱ्यापैकी लम्पी स्कीनचा (Lumpy Skin) प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे आता शेतकरी हितासाठी जनावरांचे बाजार, शर्यती सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
लम्पी स्कीनने पशुधन (Livestock) दगावलेल्या पशुपालकांना महिनाभरात शंभर टक्के मदत दिली जाईल,'' अशी माहिती महसुल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
नगर येथे शनिवारी (ता.२४) बोलताना विखे-पाटील म्हणाले, ''राज्यात लम्पी स्कीनची जनावरांना बाधा होत असल्याने आणि त्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जनावरांचे बाजार, पशुधन वाहतूक, शर्यती, मेळावे बंद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते.
आता लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाली आहे. लसीकरणही पूर्ण झाले आहे. आठवडाभरापूर्वी नगर जिल्ह्यातील बाजार सुरु करण्याचे आदेश दिले होते. आता शेतकरी हितासाठी राज्यातील सर्व भागांत जनावरांचे बाजार, शर्यती सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे खरेदी-विक्री करण्याची अडचण दूर होणार आहे.''
Lumpy Skin : लम्पी स्कीन आजारामुळे २२१ जनावरे दगावली
''लम्पी स्कीनच्या आजाराने आतापर्यंत ३० हजारापेक्षा अधिक जनावरे मृत्यू झाली आहेत. नुकसान झालेल्या पशुपालकांना मदत देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्यात वीजेचा प्रश्न सातत्याने पुढे येत आहे. हंगामाच्या काळात रोहित्राचा प्रश्न निर्माण होतो. त्यावर मात करण्यासाठी व रोहित्रांची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून विभागनिहाय रोहित्राची बॅंक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनचा निधी पूर्णपणे खर्च करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास ऊर्जामंत्री निधी देतील,'' असेही विखे यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी अध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, भैय्या गंधे, सचिन पारखी आदी यावेळी उपस्थित होते.


0 Comments