LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पेनुर ते भोसे रस्त्याचे नूतनीकरण झालेच पाहिजे

 


 फोटो ओळ : - संबंधित अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देताना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेचे पदाधिकारी.

 प्रतिनिधी 

 पंढरपूर 

 पेनुर ते भोसे रस्त्याची फक्त दुरुस्ती नको तर नूतनीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेच्या वतीने  पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील  बस स्थानक चौकामध्ये रास्तारोको करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 हे रस्ता रोको आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम पोवार, राज्याध्यक्ष सचिन खैरमोडे  यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश भोसले, महिला जिल्हाध्यक्ष संगीता भोसले, पंढरपूर तालुका अध्यक्ष विनायक निंबाळकर, मोहोळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय सुरवसे, जिल्हा कार्याध्यक्ष मारुती क्षीरसागर , जिल्हा उपाध्यक्ष मारुती लोंढे, मोहोळ तालुका उपाध्यक्ष गणेश सरवळे, बिभीषण  धुमाळ, महादेव भोसले, रावसाहेब कदम, बाळासाहेब पवार, राहुल गाडे, गणेश वसेकर  यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.

 पेनुर ते भोसे हा रस्ता पंढरपूर व मोहोळ तालुक्याला जोडणारा दुवा असून या रस्त्यावर मोहोळ तालुक्यातील पेनुर, येवती तर पंढरपूर तालुक्यातील रोपळे, मेंढापूर पांढरेवाडी भोसे यासह खरातवाडी बाभुळगाव आदी गावातील नागरिकांची ये जा असते. परंतु या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर  खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करून या रस्त्याचे नूतनीकरण न करता डागडुजी करण्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यामुळे काही दिवसातच  ती केलेली दुरुस्ती उचकटून रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांची चाळण होत आहे. यामुळे नागरिकांची समस्या सुटत नाही तर दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेली रक्कम मात्र वाया जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे ही मागणी  लावून धरत संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 यावेळी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अधिकाऱ्यांनी  आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी गाव कामगार तलाठी ठाकरे  उपस्थित होते. तर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.


 किती वेळा करणार दुरुस्ती....

 पेनुर ते भोसे या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून फक्त दुरुस्ती होत असून तीही  निकृष्ट दर्जाची केली जाते . यामुळे नागरिकांना या रस्त्यावरील खड्ड्यांच्या साम्राज्यातूनच प्रवास करावा लागतो. म्हणून या रस्त्याचे नूतनीकरण झालेच पाहिजे अशी मागणी असून मागणी पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र  आंदोलन उभे करू.

 विनायक निंबाळकर तालुकाध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटना 


 स्थगिती उठल्यानंतर रस्ता नूतनीकरण....

 पेनुर ते भोसे  या मार्गासाठी निधी प्रस्तावित असून शासनाने या कामास स्थगिती दिली आहे. ती स्थगिती उठल्यानंतर या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून आंदोलन करणाऱ्या संघटनेस पत्राद्वारे देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments