तीन तास विद्यार्थी उन्हात तर अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक दांडी
पंढरपूर (प्रतिनिधी):संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या दोन तास अभ्यासासाठी या उपक्रमातील देगाव ता. पंढरपूर या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची अचानक बदली करून विद्यार्थ्यांचे जाणीवपूर्वक शैक्षणिक नुकसान केल्यामुळे आमच्या हक्काचा शिक्षक आम्हाला मिळावा या मागणीसाठी पंढरपूर पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर शेकडो विद्यार्थी व महिला पालकांनी आंदोलन केले होते. सकाळी साडेदहापासून हे आंदोलन सुरू झाल्यानंतर या कार्यालयातील गटशिक्षणाधिकारी श्री महारुद्र नाळे जवळपास तीन तास इकडे फिरकले नाहीत.सकाळपासून दहा मिनिटात आलो पंधरा मिनिटात आलो असे ते सतत सांगत होते मात्र वाट पाहून पाहून विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
गेल्या दोन ते तीन तासांपासून पालक व विद्यार्थी साहेब येथील या आशेवर ताटकळत बसले असले तरीही शिक्षण विभाग व पंचायती समितीमधील गटशिक्षणाधिकारी यांना मात्र याचे कसलेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे थेट शिक्षणमंत्र्यांनी अशा निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी आर्त हाक या आंदोलनातील महिला पालक व विद्यार्थ्यांनी दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव श्री माऊली हळनवर,राष्ट्रवादीचे महंमद वस्ताद, देगावचे सरपंच श्री संजय घाडगे,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष श्री धनाजी घाडगे,झाकीर शेख यासह देगाव ग्रामस्थ पालक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*गरीब महिला पालकांचा बुडाला रोजगार*
आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व आपली गरिबी,आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी या आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास सर्वच माता-भगिनी पालक या रोजंदारीवर काम करणारे आहेत. रोजंदारीवर काम करून आपला उदरनिर्वाह भागवून आपल्या मुलांना शिक्षणाचा खर्च त्या करत आहेत.मात्र काल दिवसभर आंदोलन करावे लागल्याने या महिलांचा रोजगार बुडाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र आमच्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी आम्ही तेही सहन करू असेही त्या सांगायला विसरल्या नाहीत.
*आंदोलनानंतर आली शिक्षण विभागाला जाग*
*मूळ शिक्षकाला दिली पुन्हा पदस्थापना*
हे आंदोलन सुरू झाल्यानंतर देगाव जिल्हा परिषद शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत घोषणांनी हे कार्यालय दणाणून सोडले होते. गटशिक्षणाधिकारी श्री महारुद्र नाळे हे आपल्या कार्यालयात आले असता नेहमीप्रमाणे सुरुवातीला त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली मात्र विद्यार्थी व पालकांचा संताप पाहून त्यांनी सदर शिक्षकाला मूळ ठिकाणी पुन्हा अवधू होण्याचे आदेश दिले आहेत.
*मराठी शाळा बंद पाडण्याचा अधिकाऱ्यांचा डाव*
जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्या व गुणवत्तापूर्ण व्हाव्या यासाठी आपल्या शिक्षणमंत्र्यांनी खूप चांगले व धाडसी निर्णय घेतलेले आहेत. मात्र असे असले तरी पंढरपूर पंचायत समितीमधील काही निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांमुळे जाणीवपूर्वक या शाळा बंद पाडण्याचा डावा आखला जात आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून मराठी शाळा टिकावयासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


0 Comments