मुंबई दि. १३ मार्च: पंढरपूर कॉरिडॉर आणि देवस्थान परिसरातील प्रश्नांबाबत अधिवेशन काळात येत्या १६ मार्च रोजी बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषदेत दिले.
लक्षवेधी प्रश्नावेळी आमदार मा. डॉ. मनीषा कायंदे यांनी राज्य सरकारच्या पंढरपूर देवस्थान परिसरातील कॉरिडोरला स्थानिक नागरिकांचा आणि वारकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगितले मात्र याकडे शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. याबाबत शासनाने स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली.
यासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंत्री महोदयांना निर्देश देताना सांगितले की, 'पंढरपूर येथील पालखी मार्गाचे प्रश्न आणि स्थानिक प्रश्न या संदर्भात एकत्रित बैठक होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे या कामाच्या पूर्ण विकासापर्यंत अद्याप पोहोचता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या आणखीन खोलात न जाता या अधिवेशनामध्ये येत्या गुरुवारी १६ तारखेला पालकमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी या सर्वांची या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढावा.'
तसेच यावेळी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, 'पंढरपूर येथील भक्त निवासाकरिता २००५ - ०६ मध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी निधी दिला आहे. मात्र आजही भक्त निवासाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. यावर पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे ७३ कोटीच्या निधीचा वापर कसा करणार आहात याबाबत आणि इतर हरकतींबाबत पालकमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी,' असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी बचाव समिती यांनी दिलेले आराखडे आणि सरकारकडील आराखड्यात काय फरक आहे. हे पण सर्वांना सांगितले पाहिजे, असेही नमूद केले.
यावर मंत्री महोदय मा. उदय सामंत यांनी, आपल्याच दालनात बैठक घेऊन आपण दिलेल्या निर्देशानुसारच काम केले जाईल, असे सांगितले. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पात कोणावरही अन्याय केला जाणार नसल्याचेही मंत्रिमहोदय म्हणाले.
------


0 Comments