पंढरपुरातील 18 हजार जणांनी घेतला लाभ
पंढरपूर- येथे पाच दिवस सुरू असलेल्या सहजयोग महोत्सवामध्ये संपूर्ण भारतासह विविध चौदा देशातील साधकांनी हजेरी लावून भारतीय संस्कृती जगामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असल्याचा अनुभव घेतला. पंढरपूर शहर व तालुक्यातील अठरा हजार जणांनी देखील या महोत्सवात सहभाग घेऊन विश्वबंधुत्व व वैश्विक प्रेमाची अनुभूती घेतली.
प्रसिध्द अध्यात्मिक गुरू माता निर्मलादेवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने देशातील प्रमुख ठिकाणी सहजयोग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरमध्ये देखील पाच दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदर महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला. पंढरपूर ध्यानकेंद्राच्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सुरूवात कार रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली. यानंतर चार दिवसांच्या मुक्कामामध्ये पहाटेचे ध्यान, दिवसभरात समाजाच्या विविध वर्गामध्ये पोहचून सहजयोग अनुभूती व ज्ञानदानाचे कार्य, भक्तीमय वातावरणात रंगलेली भजनसंध्या, दीपोत्सव, पसायदानाचे पठण, दिव्यत्वाचा अनुभव देणारे नृत्य सादरीकरण, गायन-वादन, आरोग्य तपासणी शिविर आदी विविध अंगाने हा महोत्सव रंगला. या पाच दिवसांच्या विविध कार्यक्रमांमध्ये पंढरीतील सुमारे १८ हजार जणांनी याचा लाभ घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती.
या महोत्सवात विविध संस्था, संघटनांसह स्वेरी कॉलेज, न्यू सातारा संकुल, सिंहगड कॉलेज, एमआयटी स्कूल, सखुबाई कन्या प्रशाला, कर्मवीर औदुंबररावजी पाटील शाळा, नगरपालिकेची सहा व सात नंबर शाळा यामधील विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी पुणे, मुंबई, नागपूर, लातूर, सोलापूर, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथून आलेल्या साधकांनी मार्गदर्शन केले.
सदर महोत्सवासाठी विजय नलगिलकर, दिलीप नलगिलकर, शशिकांत कुंभोजकर, कुमार कुलकर्णी, चंद्रकांत देवडा आदींनी मार्गदर्शन केले. तर डॉ. सौम्या हिंदुजा, डॉ. हर्षल निमकडे, डॉ. शैलेश यांच्यासह पंढरपूर ध्यान केंद्रातील साधक गणेश ताडे, बाबासाहेब लवटे, सचिन वाघमारे, श्रेयस कुलकर्णी, बालकृष्ण नागटिळक, रणजित मोरे, दत्तात्रय ढावरे, गणेश माने, अनिता बळवंतराव, नीता अष्टेकर, श्रद्धा पाटील, सागर करमाळकर, अकलूज केंद्राचे प्रशांत रेळेकर, डॉ. पोखरे, अमोल कथले, मोहोळचे युवराज कोळी आदींनी परिश्रम घेतले.
पंढरपूर येथे सहजयोग ध्यान केंद्र कासेगाव रस्त्यावरील लोटस स्कूलच्या समोर, श्री माताजी निर्मलादेवी स्कूल, गणेशनगर व महिला मंडळ शाळा, महावीरनगर येथे भरविले जाते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
चौकट
रशिया- युक्रेन-इस्रायल एकाच व्यासपीठावर
पंढरपुरात या महोत्सवाच्या निमित्ताने विविध देशातील साधकही सहभागी झाले होते. यामध्ये १४ देशातील नागरिकांनी प्रत्यक्ष तर जवळपास ४० देशातील साधकांनी ऑनलाइन माध्यमाव्दारे सहभाग घेतला. विशेष म्हणजे ऐकीकडे रशिया व युक्रेन मध्ये युध्द सुरू आहे. इस्त्रायल देशातही घमासान सुरू आहे. परंतु या देशातील नागरिक पंढरीत सहजयोगाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर अध्यात्मिक अनुभूती घेत होते. एरिक, भाव्या, ब्रिगेट्टी, लियान, अँड्री, अथोम, व्हिक्टर या साधकांनी सामूहिकपणे श्रीविठ्ठलाचे दर्शन घेतले. येथील वारकरी परंपरा पाहून परदेशी साधक थक्क झाले असल्याचे चित्र होते.


0 Comments