काल महाराष्ट्र पोलीस दलातील १९८९ च्या भा पो से तुकडीतील अधिकारी एक अत्यंत निस्पृह, मनमिळाऊ, विद्वान, सत्शील आणि विवेकी व्यक्तिमत्व डॉ श्री भूषणकुमार उपाध्याय सेवानिवृत्त झाले. नावाप्रमाणेच ते पोलीस दलाचे भूषण आहेत. आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जनतेचे प्रेम आणि आदर मिळवला.
विठ्ठलाच्या पंढरीतून त्यांनी सेवेची सुरुवात केली आणि आपल्या प्रकांड पांडित्यपूर्ण अमृतवाणीमुळे त्यांनी महाराष्ट्रात हभप म्हणून एक उत्कृष्ट वक्ता म्हणून आपला कीर्तिमान स्थापित केला. सर मूळचे बिहारचे ! त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे शिक्षक व्हायचे होते. कालच्या त्यांच्या निरोपाच्या भाषणात त्यांनी पोलीस खात्यात का आले त्याचे गमक सांगितले. नामसाधर्म्यामुळे एका वॉरंटची अंमलबजावणी करताना स्थानिक पोलिसांनी त्यांच्या वडिलांना चुकीने अटक केली.
या घटनेमुळे वडिलांचा झालेला नाहक अपमान व कुटुंबाची नामुष्की त्यांच्या विद्यार्थी जीवनाला कलाटणी देऊन गेली. त्यांनी आयपीएस व्हायचे व्रत घेतले आणि जिद्दीने पूर्णही केले. मात्र सेवेत आल्यानंतर त्यांनी हे सतीचे व्रत अखंड जपले आणि सामाजिक सलोखा आणि एकता वृंध्दीगत करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. योगाचा आणि अध्यात्माचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्या या विषयावरच्या चिंतनातून प्रगल्भ आणि वाचनीय ग्रंथ निर्माण झाले आहेत. निरोपाचे भाषण त्यांनी शुद्ध मराठीतूनच केले. सेवानिवृत्तीनंतर ते नागपूरला स्थायिक होणार आहेत आणि आपले ज्ञान प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोलीस दलात सढळपणे वाटणार आहेत. अशा खाकीतील व्यासंगी योगी पुरुषास सादर दंडवत आणि मनःपूर्वक शुभेच्छा......


0 Comments