पंढरपूर दि.(२४) :- माघ यात्रा सोहळा गुरुवार, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होत असून, यात्रा सोहळा कालावधी दि. २३ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी असा आहे. या सोहळ्यासाठी सुमारे मोठ्या प्रमाणात भाविक शहरात येतात. विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असलेने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी चेंगराचेंगरी होवून जीवित हानी होण्याची दाट शक्यता असलेने दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ०६.०० ते दि.२९ जानेवारी २०२६ रोजीचे सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी, भाविक यांच्याकरीता बाहेर पडण्यासाठी एकेरी रहदारीस खुला ठेवणेबाबत आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.
माघ यात्रा सोहळयाकरीता लाखो भाविक पंढरपूर शहर व परीसरात येतात व एकादशी सोहळयादिवशी चंद्रभागा स्नान करून भाविक श्री विष्ठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. तेव्हा महाद्वार घाट व आजूबाजूच्या रस्त्यामध्ये लाखो भाविकांची गर्दी असते. सदरची गर्दी नियंत्रणात आणणेसाठी पोलीस प्रशासनाला मानवी साखळीचा व रस्सीचा वापर करावा लागतो.
दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना पुरविण्यात येणा-या सोईसुविधा कमी पडू नये यासाठी प्रशासन कार्यरत आहे. तथापि पंढरपूर शहरातील भाविकांची संख्या व सुरक्षितता लक्षात घेता यात्रा सोहळयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. पश्चिमद्वार ते चौफाळा हा एकेरी मार्ग झाल्यास स्टेशन रोडकडून येणारे वारकरी, भाविक हे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भादुले चौक ते नाथ चौक तांबडा मारूती चौक- महाद्वार चौकमार्गे नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. तसेच प्रदक्षिणामार्गे येणारे भाविक हे उत्पात गल्ली येथील रस्त्याने नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात.
प्रशासनाकडून दर्शनरांग व्यवस्थापन करून गर्दी आटोक्यात आणण्याची कार्यवाही केली जाते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे जाणारे रस्ते अरूंद असून त्याठिकाणी येणारे व जाणारा मार्ग एकच असलेने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी चेंगराचेंगरी होवून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी, भाविकांना बाहेर पडण्याचा एकेरी रहदारी मार्ग केल्यास गर्दीवर नियंत्रण करणे सुरक्षित होईल. त्यामुळे पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी भाविकांसाठी बाहेर पडण्याचा एकेरी रहदारीसाठी होणे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ (क) अन्वये, सदर आदेश पारीत केला आहे.या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाईस पात्र राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0 Comments