माघ वारीसाठी चंद्रभागेच्या पात्रात शुध्द, निर्मळ पाणी सोडावे
पंढरपुर (प्रतिनिधी) : तिर्थक्षेत्र पंढरीत भरणार्या प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेली माघी यात्रा तोंडावर आलेली असतानाच प्रदुषित झालेल्या चंद्रभागेच्या पात्राचा प्रश्न ऐरणीवर आलाय. चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेलं असुन पाण्यात अनेक लहान मोठे जंतू, किटक, आळ्या आढळुन येत आहेत, या पाण्यात स्नान केल्यानंतर भाविकांच्या अंगाला खाज सुटत असुन विविध त्वचेच्या विकारांचा सामना भाविकांना करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला असुन जर हे सत्य वाटत नसेल तर प्रशासकीय अधिकारी व नेते मंडळींनी या पाण्यात स्नान करुन खात्री करावी. आणि चंद्रभागेच्या पात्रात तातडीने शुध्द व निर्मळ पाणी सोडावे, अन्यथा पालकमंत्र्यांना याच दुषित पाण्याने आंघोळ घालु! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय.
गेल्या कित्येक वर्षांपासुन चंद्रभागेच्या पात्रातुन अविरतपणे वाळु उपसा करणार्या वाळु चोरट्यांमुळे चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र खड्डे पडलेले असुन वाळु चोरट्यांनी विष्णुपदानजीकच्या बंधार्याची दारे काढल्यामुळे चंद्रभागेत असलेले होते-नव्हते ते पाणीही वाहुन गेले असल्याने चंद्रभागेत स्नानासाठी येणार्या लाखो वारकरी भाविकांची मोठी निराशा होत आहे. चंद्रभागेच्या पात्राची ही अवस्था पाहुन प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर वारकरी भाविकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारकरी सांप्रदायात चंद्रभागेच्या स्नानाला अनन्यसाधारण महत्व असुन कांही भाविक तिर्थ म्हणूनही येथील पाणी प्राशन करत असतात. परंतु सध्या चंद्रभागेच्या पात्रात पाणीच राहिले नसल्याने सर्वत्र गाळ भरला असुन ठिकठिकाणी कचरा, चिंध्या, निर्माल्य साठुन राहिलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.
आम्ही वारंवार चंद्रभागेच्या पात्राच्या या दुरावस्थेबाबत विविध आंदोलनं करुनही याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. आता मात्र चंद्रभागेच्या पात्राची ही दुरावस्था उघड्या डोळ्याने बघुही वाटत नाही, एवढी वाईट परिस्थिती बनलीय, त्यामुळे त्वरीत चंद्रभागेची स्वच्छता करुन पात्रात पाणी सोडावे अन्यथा आम्ही वरील दिलेल्या इशार्याप्रमाणे भाविकांच्या हितासाठी आंदोलन करु, आणि यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहीन अशी माहितीही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
0 Comments