एसपी समीर शेख नोव्हेंबर 2022 मध्ये गडचिरोली येथून सातार्यात रुजू झाले. अवघ्या पाऊणेदोन वर्षात अनेक कामगिरीची घोडदौड सुरु केली. कायदा व सुव्यवस्था राखत पोलिस दलाच्या पलीकडे जावुन वेगवेगळ्या आयडिया त्यांनी राबवल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रतापगड येथील अफजलखान कबरीलगतच्या अतिक्रमणावर हातोडा त्यांनी मारला. पहिल्याच आठवड्यात असा षटकार मारल्यानंतर पुढेही त्यांनी घरफोड्या करणार्यांना जेरबंद करुन सर्वसामान्य नागरिकांचे सुमारे 4 किलो सोने त्यांनी मिळवून दिले. गुंडा-पुंडांचाही बंदोबस्त करत संघटीत गुन्हेगारी (मोका), तडीपारी, एमपीडीए याचा धडाका ठेवला. प्रतापसिंह नगरातील गुन्हेगारांच्या बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवला. सातारा जिल्ह्यातील तरुण होतकरुन युवक भरकटू नये, त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी हजारो युवकांना-युवतींना उंच भरारी या प्रकल्पाद्वारे काम मिळवून दिले. एसपी समीर शेख यांच्या कालावधीत लोकसभेची निवडणूक देखील शांततेत पार पडली.
एसपी समीर शेख यांचा अद्याप कालावधी पूर्ण झालेला नसतानाच मंगळवारी रात्री अचानक त्यांची बदली झाल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये या बदलीबाबत चीड निर्माण झाली. यानंतर मात्र एसपी समीर शेख हे धीरोदात्तपणे सामोरे गेले. प्रशासनातील सर्व अनुभव त्यांनी पणाला लावला. तीन तासांमध्ये अनेक घडामोडी झाल्यानंतर गृह विभागांची आणखी एक ऑर्डर आली आणि एसपी समीर शेख यांची बदली थांबली. ही बातमी सातारा जिल्ह्यात वार्यासारखी फिरल्यानंतर त्याचे सातारकरांनी स्वागत केले. प्रामाणिक व सच्च्या अधिकार्याला न्याय मिळाला, अशी भावना निर्माण झाली, दुसरीकडे गृह विभागाचा व राज्यकर्त्यांचा सुरु असलेला भोंगळ कारभार देखील समोर आला. अवघ्या तीन तासांत सातारच्या पोलिस अधीक्षकांची बदली थांबवावी लागली. आयएएस अधिकार्यांच्या बाबतीत अशा ऑर्डर होतात. मात्र पोलिस अधिकार्यांच्या बाबतीत एकदा ऑर्डर झाली की पुन्हा लगेच थांबली असे होतच नाही. मंगळवारी मात्र सातारचे एसपी समीर शेख यांच्या बाबतीत असे घडले. त्यातून समीर शेख यांची कारकीर्दही उजाळून निघाली.

0 Comments