LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात मनसेचा विक्रमी मताने विजय तीर्थक्षेत्र आघाडीच्या सर्व नेत्यांना एकत्रित करण्याचे जनक ठरले मनसे नेते दिलीप धोत्रे; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा



पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर नगर पालिका निवडणुकीत परिचारक गटाच्या चार दशकाच्या सत्तेला सुरुंग लावत तीर्थक्षेत्र आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यासह नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १७ मधून उभ्या असलेल्या मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे यांनी विक्रमी मतांनी विजयी संपादन केल्याने या तीर्थक्षेत्र आघाडीच्या यशाचे किंगमेकर मनसे नेते दिलीप धोत्रे ठरल्याची जोरदार चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.

तब्बल नऊ वर्षानंतर पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अनेक राजकीय घडामोडी पहावयास मिळाल्या. 
पंढरपूर नगरपालिकेच्या सत्ताधारी पांडुरंग परिवारा विरोधात विठ्ठल परिवाराचा नगराध्यक्षपदासाठी एकच उमेदवार दिला जावा यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सुरुवातीपासूनच साखर कारखान्याच्या निवडणुकीत विस्कटलेल्या विठ्ठल परिवारातील नेते एकत्र ठेवण्याचे काम केल्याने नगराध्यक्ष पदासाठी परिवाराचा एकच उमेदवार दिला गेल्याने तीर्थक्षेत्र आघाडीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटल्याने नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता भालके यांचा विक्रमी मताने विजय मिळवता आला. निवडणूक निकालानंतर या विजयाचे किंगमेकर मनसे नेते दिलीप धोत्रे ठरले असल्याने पंढरपुरात मनसेची ताकद वाढली असल्याचे जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागले आहे.
पंढरपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह १८ प्रभागातून ३६ नगरसेवक पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये भाजप आणि शहर विकास आघाडीचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत तर तीर्थक्षेत्र आघाडीचे ११ आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये पंढरपुरातील नागरिकांनी भाजपाचे २४ नगरसेवक निवडून दिले असले तरी नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता भालके यांना पसंती दर्शवत विक्रमी मतांनी निवडून दिल्याने पुढील होणाऱ्या अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद पहावयास मिळणार आहेत.

Post a Comment

0 Comments