प्रतिनिधी / -
अंजनगाव खे. (ता. माढा) येथील शेतकरी विश्वनाथ हरिभाऊ पांढरे यांच्या शेतातील द्राक्षबाग भेसळयुक्त खतामुळे मोठ्या प्रमाणात जळाल्याची घटना घडली असून, या घटनेची गंभीर दखल घेत माढा विधानसभेचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी आज प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाहणी केली.
यावेळी संबंधित खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार पाटील यांनी जळीत झालेल्या द्राक्षबागेबाबत सविस्तर माहिती घेऊन तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. सदर खताचे नमुने हैदराबाद येथील अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून संबंधितांना लेखी नोटीस देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याबाबतही स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी नितीन बापू कापसे, तालुका कृषी अधिकारी श्री. चंदन साहेब, कृषी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री. गावडे साहेब, विनंती कुलकर्णी, योगेश पाटील, नागेश इंगळे, दत्तात्रय पाटेकर, समाधान इंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
संबंधित शेतकरी, खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना खताचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यास सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले असून, सदर प्रकरणात शेतकऱ्यांची कुठेही चूक आढळल्यास त्याची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारू, असे ठाम आश्वासन आमदार अभिजीत आबा पाटील यांनी दिले.

0 Comments