पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांनी आपले जीवन मोबाईल वापराच्या चाकोरीबाहेर घालविले पाहिजे. सध्याच्या युगात माणूस हा सोबतच्या माणसापेक्षा हातातील मोबाईलकडे अधिक लक्ष देत आहे. यामुळे त्याच्या सामाजिक व मानसिकतेवर दुष्परिणाम होत असल्याचे जाणवते आहे. मोबाईलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल वापराचा अतिरेक न करता गरजेपुरताच वापरावा. यामुळे शारिरीक, मानसिक स्वास्थ्य जपले जाते.’ असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.वीरेंद्र सिंह सोलंकी यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पंढरपूरच्या वतीने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये विद्यार्थ्यांबरोबर ‘स्क्रीन टाईम टू अॅक्टीव्हिटी टाईम’ या अभियानाच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी ते आले होते. सुरुवातीला माता सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी व सोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात पंढरपूर शहर मंत्री ऋषिकेश सातपुते यांनी स्वेरीमध्ये कार्यक्रम आयोजिन्याचे कारण स्पष्ट केले. पंढरपूरचे जिल्हा संयोजक पवन भोसले यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वाटचाल सांगताना गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीचा लेखाजोखा मांडला. राष्ट्रीय महामंत्री वीरेंद्र सिंह सोलंकी हे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, ‘आजचा युवक हा सोशल मिडीयाच्या सहाय्याने अधिक गतीने धावत असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत ऑनलाईन गेम, ओटीटी व्यासपीठच्या माध्यमातून मोबाईलचा ’स्क्रीन टाईम’ नाहक वाढत याहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकास संदर्भातील समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. यासाठी जास्त वेळ मोबाईल वापरणाऱ्या विद्यार्थांना जागृत करणे, दुष्परिणाम ओळखून मोबाईल वापरापासून दूर सारणे, मैदानी खेळावर भर देणे, मैदानी खेळ खेळणे, योगा, प्राणायम यावर भर देणे, नातलग तसे गुरुजन वर्ग आणि मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करणे, त्यांच्याशी संवाद साधून संस्कृती जपल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवू शकतो तसेच आपले मन सामाजिक कार्यात गुंतवल्यास मानसिकता टिकून राहते' असे सांगून याबाबत जनजागृती कशी करता येईल हे सांगितले. संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘अनेक वेळेस विद्यार्थ्यांना विकासाच्या संधी उपलब्ध होत असतात. कोरोना महामारीपूर्वी स्वेरी कॅम्पसमध्ये मोबाईल हा शब्द देखील नव्हता. पुढे काळानुसार ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी मोबाईल वापरात आला. आता रेग्युलर शिक्षणात कुणाकडेही मोबाईल आढळत नाही. त्याच बरोबर वेळापत्रकानुसार विद्यार्थी नियमित पणे स्वेरी कॅम्पस मध्ये प्राणायम करतात.’ असे सांगून मोबाईलच्या अतिप्रमाणात वापराचे तोटे सांगितले.’ यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाविद्यालय अध्यक्ष ओंकार माळी, आदित्य कदम, ओम इंगळे, आदित्य मस्के, चोपडे, अदिती भुसनर, अॅड. पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम.पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments