पंढरपूर: ‘भूतकाळातील घटनांचा आढावा व भविष्यकाळाचा वेध घेताना क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. सावित्रीबाई यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने एक स्त्री चूल आणि मुल या चाकोरी बाहेर आली पण त्यापलीकडे माणूस म्हणून पूर्वी स्त्री कडे कोणी पाहत नव्हते आज फुले दांपत्यामुळे स्त्रीला स्वतंत्र ओळख निर्माण झाली. फुले दांपत्यांनी चाकाला शिक्षणाचे आरे फिरवले आणि समाज गतिमान झाला. म्हणून समाज जागृत होण्यासाठी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन पंढरपुरातील उमा महाविद्यालयाच्या बी.एड. विभागाच्या प्रा. सविता दूधभाते यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. सविता दूधभाते हया मार्गदर्शन करत होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानंतर वसतिगृहातील विद्यार्थिनी जान्हवी पवार यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर सुंदर भाष्य केले. पुढे बोलताना प्रमुख पाहुण्या प्रा. दूधभाते म्हणाल्या की, ‘त्या काळात सावित्रीबाईंनी जो कणखरपणा आणि धाडस, धैर्य, जिद्ध, चिकाटी दाखवली तीच आज आपण दाखवणे आवश्यक आहे. तरच सावित्रीबाईंची जयंती सत्कारणी लागेल. फुले दांपत्यांनी महिलांना शिक्षण हा केंद्रबिंदू मानून संपूर्ण समाजाला नवा विचार, नवी गती देत सामर्थ्य, बुद्धिमत्ता व चातुर्य यांचे महत्व पटवून दिले. शिक्षणाच्या प्रवाहात जात असताना त्यावेळीची स्थिती व आत्ताची स्थिती फारशी वेगळी नाही. त्यावेळी सावित्रीबाई फुले ह्या ज्योत बनून कार्य करत राहिल्या म्हणून आज सकारात्मक विचारांच्या माध्यमातून क्रांतीज्योत तेवत ठेवणे शक्य होईल.’ असे सांगून विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, प्रा. माणिक देशमुख, प्रा. संगिता जाधव, डी. फार्मसीचे प्रा. सौरभ कौलगी, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रा. महावीर लोखंडे, इतर प्राध्यापक, प्राध्यापिका, वसतिगृहातील जवळपास दोन हजार विद्यार्थिनी व वसतिगृहातील महिला कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सेजल पारगे व सायली शिनगारे या विद्यार्थिनींनी उत्तमरित्या व ओघवत्या शैलीत केले तर वसतिगृह व्यवस्थापक प्रा. आशुतोष गरड यांनी आभार मानले.
चौकट: सध्या परीक्षेचा कालावधी सुरू असून देखील प्रमुख पाहुण्या प्रा. दूधभाते यांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील उत्तम विचार ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थिनी एकरूप झाल्या होत्या.

0 Comments