-अॅड.सुनीता साळसिंगीकर
स्वेरीमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा
पंढरपूर: ‘आजच्या युगात स्त्री-पुरुष समानता आली आहे तरी देखील यशस्वी जीवन जगण्यासाठी मुलींनी मानसिकरीत्या कणखर होणे गरजेचे आहे. फक्त पैसा कमविणे म्हणजे आयुष्य नसून एक चांगला माणूस बनणे हा आपल्या आयुष्याचा मुख्य उद्देश असावा. आई, बहीण, पत्नी, मुलगी यांच्याकडे काळजीपूर्वक पाहावे. यातूनच आपल्यावर घालून दिलेले संस्कार दिसतात. आपल्यावर संस्कार करणारे हेच असतात याच संस्कारामुळे आपल्या करिअरला योग्य दिशा मिळत असते. म्हणून उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्यावर होणारे संस्कार महत्त्वाचे असतात.’ असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाच्या अॅड. सुनीता साळसिंगीकर यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुटमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई हायकोर्टाच्या अॅड.सुनीता साळसिंगीकर ह्या उपस्थित होत्या तर विशेष अतिथी म्हणून सौ.अलका कोळेकर ह्या लाभल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे हे होते. महाराष्ट्र गीत व स्वेरीच्या गीतानंतर प्रास्ताविकात डॉ. यशपाल खेडकर यांनी स्वेरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती तसेच स्वेरीच्या यशस्वी वाटचालीतील महत्वाचे टप्पे यावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना प्रमुख पाहुण्या अॅड.साळसिंगीकर म्हणाल्या की ‘संस्कृतीला शोभेल असे वर्तन आपल्यात असावे. त्याचा भविष्यात करिअर करताना फायदा होतो. सोशल मिडीयाला आवश्यक तेवढाच वेळ द्या. त्याऐवजी संदर्भ ग्रंथ, प्रेरणादायी पुस्तके हे तुम्ही हाताळू शकता ज्याचा भविष्यात फायदा होतो. संस्कारित होण्यासाठी कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध, व्यवहारज्ञान यावर देखील भर दिला पाहिजे.’ असे सांगून अॅड. साळसिंगीकर यांनी अनेक कर्तबगार महिलांची उदाहरणे देताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ, अंतराळ कन्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या सारख्या कर्तबगार महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनतर अध्यक्ष स्थानावरून बोलताना स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, 'कोणत्याही प्रसंगांना सामोरे जात असताना आपल्याला नवनवीन बाबी शिकायला मिळत असतात. त्यामुळे समाजात वावरताना याच बाबी उपयोगी पडतात. त्या शिकून घेतल्या पाहिजेत. मिळणाऱ्या यशानं हुरळून जायचे नाही आणि जर दु:ख वाट्याला आले तर खचून जायचे नाही. हाच जीवनाचा मार्ग आहे.’ असे सांगून त्यांनी यशस्वी महिलांचा संघर्षात्मक प्रवास सांगितला. ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने विविध विभागात गुणवत्तेत आलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर अॅड. सुनीता साळसिंगीकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या स्वेरी लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ.पी.एस. बनकर, डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ.डी.ए. तंबोळी, प्रा.व्ही.डी.जाधव, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, इंजिनिअरिंग, फार्मसीच्या पदवी व पदविका व स्वेरी लॉ कॉलेज या पाचही महाविद्यालयांतील प्राध्यापिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या विभागप्रमुख डॉ.नीता तळवळकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. यशपाल खेडकर यांनी आभार मानले.

0 Comments