सोलापूर : दिनांक, २३ मार्च २०२६
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील गंभीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे निदर्शने आंदोलन करत मा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
या प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून आरोपी अशोक खरात याला फाशी, सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी, अकार्यक्षम ठरलेल्या गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे म्हणाल्या की, अशोक खरात या स्वघोषित ‘कॅप्टन’ व ज्योतिषाच्या अटकेनंतर राज्यभरात अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. महिलांना भविष्य सांगण्याच्या नावाखाली धमकावून लैंगिक शोषण करण्यात आले, तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर महिलांचे शोषण झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपीचे अनेक सत्ताधारी राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याच्या चर्चा आणि समोर आलेले फोटो-व्हिडिओ पाहता तपासावर दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांवर दबाव टाकण्याचे प्रकारही समोर येत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे.
म्हणून या प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात यावा, सर्व पुराव्यांची सखोल चौकशी करून पीडित महिलांना न्याय द्यावा, संबंधित सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडितांना संरक्षण व मदत उपलब्ध करून द्यावी, यांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत, त्यांची सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास सहआरोपी करण्याची मागणी केली. तसेच आरोपीसोबत संबंध असलेल्या सर्व संबंधित लोकप्रतिनिधींवरही तात्काळ कारवाई करून त्यांचे राजीनामे घ्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत असताना गृहखाते निष्क्रिय ठरले आहे. अशा गंभीर प्रकरणांमध्ये सरकार अपयशी ठरत असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
या आंदोलनाद्वारे भोंदूबाबा अशोक खरात याला फाशी देण्यात यावी व इतर आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करून संबंधित सर्वांचे चेहरे उघड करावेत आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांनी केली आहे.
यावेळी महिला अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, माजी नगरसेविका भारतीताई ईप्पलपल्ली, माजी महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, अँड करीमुनिसा बागवान, कोंडणताई काकडे, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, पूजा चव्हाण, मुमताज शेख, निर्मला कांबळे, अनिता भालेराव, मीना गायकवाड, जयश्री स्वामी, रंजना गायकवाड, श्रीमंतीबाई बनसोडे आदी बहुसंख्या महिला पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments