पंढरपूर - ‘स्पर्धा परीक्षेत विचारलेले सर्व प्रश्न आत्मविश्वासाने सोडवले तर यशाची शक्यता वाढते व भविष्यात त्याचा फायदा होतो मात्र प्रयत्नात सातत्य आवश्यक आहे. अपयश आले तरी प्रयत्नात खंड पडता कामा नये, हेच स्पर्धा परीक्षा देताना महत्त्वाचे असते. परीक्षा देताना मला प्रत्येक वेळी नवीन अनुभव यायचा आणि यशाला कुठे तरी हुलकावणी मिळायची. पण यातून मी निराश न होता संघर्ष सुरूच ठेवला. एक नाही, दोन नाही तब्बल सातव्या वेळी केलेल्या प्रयत्नानंतर मी अखेर डिवायएसपी झालो. कठीण परिश्रम, समर्पण भावना आणि शिस्त या जोरावर मला अशक्य वाटणाऱ्या यशाला गवसणी घालता आली.’ असे प्रतिपादन नूतन पोलीस उपाधीक्षक तथा डीवायएसपी प्रदीप गोरड यांनी व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये स्पर्धा परीक्षा विषयक ‘मार्गदर्शन सत्रा’मध्ये नूतन पोलीस उपअधीक्षक प्रदीप गोरड हे आपल्या यशाचे गुपित उलगडत होते. दीप प्रज्वलनानंतर पोलीस उपाधीक्षक गोरड यांनी आयुष्यात स्पर्धा परीक्षेची सुरुवात, त्यात झालेल्या चुका व मिळालेले अनुभव आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे या तीन टप्प्यांमध्ये मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, ‘प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत, पुढे आठवी मध्ये असताना फौजदार होण्याचे स्वप्न पाहिले, त्या दिशेने मार्गक्रमण करत असताना शाळेमध्ये सतत पहिला किंवा दुसरा नंबर आणायचो. अकरावी, बारावी सायन्स मधून शिक्षण पूर्ण केले, पुढे राज्यशास्त्र विषय घेवून बी.ए. ची पदवी संपादित केली. लहान असताना आईकडून सुरुवातीला ‘सरकार’ हे शब्द ऐकले. तेथून मी सुरुवातीला ‘फौजदार’ नंतर ‘डीवायएसपी’ होण्याचे स्वप्न पाहिले आणि स्वप्न सत्यात उतरविण्याचे ठरवत त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. पहिल्यापासून सहा प्रयत्नांमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती यामध्ये यशस्वी झालो परंतु अंतिम निकालात मात्र दुर्दैवाने फेल व्हायचो. तरीही निराश न होता अखेर सातव्या प्रयत्नानंतर निकालाच्या संकेतस्थळाच्या यादीतून मी पहिल्या क्रमांकावर पोलिस उपअधीक्षक झाल्याचे घोषित झाले. विशेष म्हणजे अखेरच्या परीक्षेमध्ये मागील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आलेल्या अपयशाचे आणि दीर्घ अनुभव उपयोगी पडले. माझ्या स्पर्धा परीक्षेत शेवटचा प्रयत्न करत असताना मी आत्मविश्वासावर भक्कम उभा राहिलो. मुलाखतीत रशिया, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आदी देशा संदर्भातील त्यावेळीच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्न विचारले गेले. अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर सर्व प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने दिली आणि ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी मी डीवायएसपी झालो होतो.’ गोरडवाडी (ता. माळशिरस) मधील अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आशादायी युवक प्रदीप दुर्योधन गोरड यांची ही प्रेरणादायी कहाणी ! त्यांनी संघर्ष करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा २०२४ परीक्षेमधून राज्यात १२ व्या रँकने यशाला गवसणी घातली होती. स्वप्न सत्यात उतरण्यासाठी गोरड यांना वेगवेगळ्या परिस्थितीतून जावे लागले. ते म्हणाले, ‘आई-वडिलांच्या कष्टाचे सोने केले पाहिजे, त्यांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे, याशिवाय दुसरा कोणताही आनंद मोठा नाही.’ हाच त्यांनी यशाचा कानमंत्र दिला. त्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंद, द्रोणाचार्य,अर्जुन यांच्या कथा ऐकवल्या. दरम्यान त्यांनी चार वर्षे मोबाईलचा वापर केला नाही. ‘मित्र,सोशल मीडिया याचा कामापुरताच वापर करा.’ असाही मेसेज त्यांनी दिला. एकूणच संघर्ष हा महत्त्वाचा असून संयम आणि सहनशिलतेमध्ये यश दडलेले असते म्हणून यशस्वी होण्यासाठी स्वप्न मोठी पहा, आत्मविश्वास बाळगा व ध्येय पूर्ण करण्यासाठी ध्येयवेडे व्हा. मग तुम्ही यशस्वी व्हाल.’ असे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू कर अधिकारी रणजित गोरड, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

0 Comments