एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल, वाखरी (पंढरपूर) येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या ‘SEWA’ (Service, Education and Work Experience through Action) या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविले. समाजसेवेची जाणीव आणि प्रत्यक्ष कृतीचा संगम साधत विद्यार्थ्यांनी इस्कॉन मंदिर परिसर तसेच घाट भागाची स्वच्छता केली. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी केवळ स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले नाही, तर पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक स्थळांविषयी जबाबदारीची जाणीवही यातून दृढ झाली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.
सीबीएसईद्वारे इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असलेला SEWA उपक्रम हा अनुभवाधारित शिक्षणावर आधारित असून समाजसेवा, सहानुभूती आणि वैयक्तिक विकास यांची नोंद ठेवतो. या माध्यमातून विद्यार्थी समाजाशी जोडले जातात आणि कोणत्याही अपेक्षेविना समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांना यातून मिळते. देशसेवा आणि सामाहिताची भावना दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाबाबत बोलताना शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी सांगितले की, “SEWA उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, वैयक्तिक, सामाजिक आणि भावनिक असा सर्वांगीण विकास होऊन भविष्यात ते एक जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनतील.” हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यासीर शेख, प्रियंका बांदल, आर. बी. भट्टाचार्य आणि सचिनकुमार शर्मा या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे परिसरातील नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले.

0 Comments