डिझायर ! डिझायर म्हणजे इच्छा , काहीतरी मिळवण्याची ,काही तरी देण्याची .... कोणतेही काम यशस्वीरीत्या पूर्ण करायचे असेल तर तर अशी इच्छाशक्ती असणे हाच यशाचा निम्मा टप्पा असतो बरं का ! मनातली इच्छाशक्ती बहुतेकदा आपणास मार्ग दाखवते दिशादर्शन करते. माझे स्वप्न अमुक आहे ,असे आपण म्हणतो याचा अर्थ असा नव्हे की ,मी झोपेत अमुक एखादे स्वप्न पाहतो.याचा अर्थ असा की , अमुक एखादी गोष्ट व्हावी मिळावी अशी माझी इच्छा आहे.कदाचित स्वप्नपूर्ती म्हणतात ना ,त्याची सुरुवात इथूनच तर होते.
कोणतेही काम हाती घेतल्यास ते तडीस जाण्याची शक्यता ज्या गोष्टीवर अवलंबून असते ,ती म्हणजे ते काम करण्याची इच्छा.जितकी तुमची इच्छाशक्ती तितके ते काम पूर्ण होण्याची शक्यता असे सूत्रच आहे . तीव्र इच्छाशक्ती हे यशाचे सर्वात महत्त्वाचे गुपित आहे.
एकदा एका तरुणाने सॉक्रेटिसला "यशाचे रहस्य काय ? " हा प्रश्न विचारला .सॉक्रेटिस ने त्याला उत्तर दिले , उद्या सकाळी तू नदीकाठी भेट त्यावेळी मी तुला या प्रश्नांचे उत्तर देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तरुण ठरल्याप्रमाणे सॉक्रेटिसला भेटला.त्यावेळी सॉक्रेटिस नदिपात्रात उभारला होता.त्या तरुणाला सॉक्रेटिस ने नदिपात्रात आत येण्यास सांगितले. तो तरुण पाण्यात सॉक्रेटिस जवळ जाताच , सॉक्रेटिस ने त्या तरुणाची मान पकडुन त्याचे तोंड खाली पाण्यात बुचकालळे.काही क्षणातच तो तरुण जीवाच्या आकांताने तोंड पाण्याबाहेर काढायला धडपडू लागला. त्याने तोंड बाहेर काढून श्वास घेतला . रागातच त्याने सॉक्रेटिसला विचारले , "काय हो मी तुम्हाला यशाचे रहस्य विचारले होते ,पण तुम्ही तर माझा जीव घ्यायला निघाला होता ,असे का ?"
सॉक्रेटिस म्हणाला , "मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देत होतो." तरुण आश्चर्यचकित झाला त्याने विचारले ,"ते कसे ?"
त्यावर सॉक्रेटिस ने सांगितले की , "मला सांग तुझे तोंड जेंव्हा पाण्यात होते , तेंव्हा तुला सर्वाधिक गरज कशाची वाटली ? "
तरुणाने उत्तर दिले ,"श्वासाची ! मी श्वास घ्यायला धडपडत होतो ."
सॉक्रेटिस म्हणाला, "यशाचे हेच तर रहस्य आहे, जेंव्हा तु पाण्यात होतास ,तेंव्हा श्वासाअभावी तुझा जीव कोंडला होता , तेंव्हा तु सर्वाशक्ती पणाला लावून उसळी घेतली व तोंड बाहेर काढलेस ह्यालाच इच्छाशक्ती म्हणतात."यशाचे रहस्य नेमके ते हेच बरं का !
जेंव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची नितांत गरज असते तेंव्हा ती मिळवण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. आयुष्यात कोणतेही ध्येय असू दे , ते ध्येय प्राप्त करायची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तरच ते ध्येय कितीही कठीण असेल तरी अप्राप्य कधीच नसते हेच खरे !
सॉक्रेटिस सारख्या महामानवाच्या या शब्दांनीच यशाचा खरा मार्ग कोणता हे स्पष्ट केले आहे.जेंव्हा आपण एखादे काम हाती घेतो तेंव्हा त्याच्या पूर्ततेची अपेक्षा करतोच.पण त्यावेळी आपण ते काम किती निष्ठेने करत आहोत ,ही बाबही त्याच्या यशावर परिणाम करते. थोडक्यात काय तर निष्ठा ही आंतरिक इच्छेचीच राखण करते.
मनापासून एखादी गोष्ट केली तर त्यात मिळणाऱ्या यशाबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नसते.अशा वेळी यशापयश या बाबी दुय्यम राहतात व मिळते ते मानसिक समाधान.जे समाधान कधीच कोणतीही किंमत देऊन विकत घेऊ शकत नाही कुणीच. एखादी गोष्ट जेंव्हा आपले सुप्त ध्येय साध्य होते ,तिलाच डिझायर म्हणले तर वावगे होणार नाही . अशा अनेक गोष्टी असतात ज्यासाठी आयुष्य ओवाळून टाकावे असे वाटते.पण त्या गोष्टी प्राप्त करायला आवश्यक हालचाली ,सातत्यपूर्ण प्रयत्न , कष्ट आपण करीत नाही.तेंव्हा त्या डिझायरला काहीच अर्थ राहत नाही ,हेही तितकेच खरे !
आनंद कशात असतो ? जी गोष्ट
आपल्याकडे नाही ती मिळवण्यात ?नव्हे हो , यात आनंद नक्कीच नाही. तर आनंद आहे ,जी गोष्ट आहे त्याबाबत गोडी वाटणे ,यातही वेगळा आनंद आहे ,समाधान आहे.मात्र त्यासाठी देखील मनात ओढ हवी.अशी ओढ मिळते ती , आंतरिक इच्छेतूनच !
जीवनात भरपूर स्वप्ने बघावीत,आणि ती स्वप्ने साकार करायला शक्य तितके प्रयत्न करावेत,यातच खरी मौज आहे. ही मौज अनुभवण्यासाठी आपल्यातच दडलेल्या आंतरिक इच्छाशक्तीचा पुरेपूर वापर करावा. हीच इच्छा आपला आत्मविश्वास वाढवते. आणि चमत्कार झाल्याप्रमाणे स्वप्ने साकार होतातच. आपल्या विवेकाला प्रामाणिक राहत तुम्ही ही इच्छाशक्ती वापरू शकता. पाहा तर तुम्ही , तुमच्या इच्छाशक्तीचा अनुभव घेऊन!
श्री. व्ही.व्ही.कुलकर्णी ,पंढरपूर.
मोबा.9767473727,
9768473727.
0 Comments