पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने डिग्री इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘जपानी भाषा आणि करिअरच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना जागतिक रोजगाराच्या संधी, जपानी भाषा, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय करिअरविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेस ‘मोसाईक प्रायव्हेट लिमिटेड’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हिरो इशिदा हे प्रमुख अतिथी व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच इंडो-जपान कौन्सिलचे श्रीकांत गुंजाळ यांनी विशेष वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वेरी या संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे स्वेरीत सातत्याने आयोजन केले जाते. दीप प्रज्वलनानंतर ट्रेनिंग व इंडस्ट्री इंटरएक्शन अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर यांनी प्रास्तविकातून या कार्यशाळेच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना हिरो इशिदा यांनी जपानी भाषा, संस्कृती, शिस्त, कार्यपद्धती आणि जपानी उद्योगविश्वातील संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून जपानी भाषा आत्मसात करण्याचा प्रवास आणि त्यातून मिळालेल्या यशस्वी संधी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये जपानी भाषा शिकण्याची उत्सुकता निर्माण झाली. विशेष वक्ते श्रीकांत गुंजाळ यांनी भारत-जपान औद्योगिक संबंध, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील करिअरच्या संधी, तसेच जपानी भाषा अवगत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आकर्षक रोजगाराच्या संधींची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले. यावेळी परदेशी भाषांचे महत्त्व पटवून देताना व अध्यक्ष स्थानावरून बोलताना उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार म्हणाल्या की, ‘जपानसारख्या आंतरराष्ट्रीय प्रगतशील देशाच्या भाषेचे ज्ञान हे विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या करिअर संदर्भात जागतिक स्तरावर नवी दिशा देऊ शकते. तांत्रिक शिक्षणाबरोबरच परदेशी भाषेचे कौशल्य आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांसाठी देश-विदेशातील रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.’ असे सांगून परदेशात असलेल्या स्वेरीच्या माजी विद्यार्थ्यांचे उदाहरणे दिली. प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. अभिषेक यांनी कार्यक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीत मोलाचे सहकार्य केले. पुण्यातील प्रा. राहुल डोले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, जपानी भाषेचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या विविध संधींची माहिती यामुळे ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविण्यासाठी अशा दर्जेदार उपक्रमांचे आयोजन करण्याचा स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सातत्यपूर्ण प्रयत्न भविष्यातही सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सूत्रसंचालन सोनाली कांबळे यांनी केले व ट्रेनिंग व इंडस्ट्री इंटरएक्शन अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर यांनी आभार मानले.
चौकट:
मागील अनेक वर्षांपासून स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विविध आंतरराष्ट्रीय भाषांच्या कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळांमुळे दरवर्षी किमान १०० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. विशेषतः जपानी आणि फ्रेंच या आंतरराष्ट्रीय भाषांच्या कार्यशाळा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे परदेशी भाषा कौशल्य विकसित होण्यास तसेच उच्च शिक्षण, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय संधींसाठी आवश्यक असलेली भाषिक क्षमता वृद्धिंगत होण्यास मोठी मदत झाली आहे.

0 Comments