अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा
*हेमंत देसाई यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर*
प्रशांत कदम, अभय देशपांडे, अनुराग त्रिपाठी, संतोष आंधळे, सचिन परब, सुनील पाटील, महेश तिवारी, अविनाश महालक्ष्मे, जान्हवी मुळे, बापुसाहेब जाधव यांचाही होणार सन्मान
शेगाव : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा "आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार" ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना जाहीर करण्यात आला आहे.. 25 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा केली..
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत उत्तुंग कार्य केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी पत्रकारांना गौरविण्यात येते.. पत्रसृष्ठीत परिषदेचे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे समजले जातात..जीवनगौरव पुरस्कार यापुर्वी दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत, प्रकाश बाळ जोशी, मधुकर भावे, रामभाऊ जोशी आदि मान्यवरांना दिला गेला आहे..
जीवनगौरव पुरस्काराबरोबरच परिषदेच्या अन्य पुरस्कारांची घोषणा देखील आज करण्यात आली.. त्यामध्ये परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष आचार्य प्र.के.अत्रे पत्रकारिता पुरस्कार संपादक प्रशांत कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.. यावर्षी पासून हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबुराव पराडकर यांच्या नावे हिंदी पत्रकारांसाठी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. बाबुराव पराडकर हे सिंधुदुर्ग मधील पराडगावचे होते.. त्यांच्या नावे दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांना जाहीर झाला आहे..
काही मान्यवरांनी परिषदेकडे ठेवलेल्या रक्कमेतून विविध पुरस्कार दिले जातात.. ते पुढील प्रमाणे
दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार : ज्येष्ठ पत्रकार सचिन परब
नागोजीराव उर्फ आण्णासाहेब दुधगावकर स्मृती पुरस्कार : ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे
ज्येष्ठ पत्रकार भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार : ज्येष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे
स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार : संतोष आंधळे
स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख देवडीकर कृषी पत्रकारिता पुरस्कार : सुनील पाटील, कोल्हापूर
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार :महेश तिवारी, गडचिरोली
सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार : जान्हवी मुळे, दिल्ली..
संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सातारा येथील ग्रामोध्दार दैनिकाचे संपादक बापुसाहेब जाधव..
रोख रक्कम स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे..
ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ात मुंबईत होणाऱ्या एका शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल अशी घोषणाही एस.एम. देशमुख यांनी केली..
आजच्या पत्रकार परिषदेला परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर, विश्वस्त शरद पाबळे, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष अनिल उंबरकर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रणजीत रजपूत आदि उपस्थित होते..
लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक कार्य पुरस्कार यावर्षी पासून देण्यात येणार आहे.. त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल..त्याचा स्वतंत्र कार्यक्रम करण्यात येणार आहे..

0 Comments