पंढरपूर: स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या संशोधन व नवोपक्रमाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमध्ये आणखी एका महत्त्वपूर्ण उपलब्धीची भर पडली आहे. महाविद्यालयातील संशोधकांनी विकसित केलेल्या ‘ऑटोमेटेड डिवाइस फॉर इव्हॅल्युएटिंग एक्स्ट्रुडेबिलिटी ऑफ सेमी सॉलिड फॉर्मुलेशन’ या नावीन्यपूर्ण उपकरणाच्या डिझाइनची भारत सरकारच्या संबंधित विभागाकडे अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे.
या रचनेची अधिकृत नोंदणी भारत सरकारच्या डिझाइन कार्यालयाकडे करण्यात आली असून तिचा डिझाइन क्रमांक ५१११३७-००१असा आहे. या रचनेची नोंदणी तारीख २७/०७/२०२६ असून ती वर्ग १०-०४ अंतर्गत नोंदणीकृत झाली आहे. या नोंदणीचे प्रमाणपत्र दि. ०८/०९/२०२६ रोजी जारी करण्यात आले असून प्रमाणपत्रावर अनुक्रमांक २५२६४३ नमूद आहे. सदर नोंदणी डिझाइन अधिनियम २००० आणि डिझाइन नियम २००१ मधील तरतुदींनुसार करण्यात आली आहे. फार्मास्युटिकल क्षेत्रात क्रीम, जेल, मलम, पेस्ट आणि इतर सेमी सॉलिड औषधी फॉर्मुलेशनच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करताना विविध भौतिक व यांत्रिक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये एक्स्ट्रुडेबिलिटी हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. औषधाचे फॉर्मुलेशन ट्यूब किंवा कंटेनर मधून योग्य प्रमाणात आणि नियंत्रित दाबाने बाहेर काढता येणे यास एक्स्ट्रुडेबिलिटी असे म्हणता येते. एक्स्ट्रुडेबिलिटी चाचणीद्वारे फॉर्मुलेशन मधून औषध बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेला दाब,फॉर्मुलेशनची सुसंगतता आणि त्याची वापरातील सुलभता यांचे मूल्यमापन करता येते. विशेषतः त्वचेवर किंवा शरीराच्या विशिष्ट भागावर थेट लागू करण्यात येणाऱ्या सेमी सॉलिड साठी हा गुणधर्म रुग्णांच्या वापरातील सोयीशी संबंधित असतो. फॉर्म्युलेशनची एक्स्ट्रुडेबिलिटी अत्याधिक कमी असल्यास उत्पादन कंटेनरमधून बाहेर काढण्यासाठी अधिक दाबाची आवश्यकता भासू शकते, तर अत्याधिक जास्त एक्स्ट्रुडेबिलिटीमुळे फॉर्मुलेशनचे नियंत्रित प्रमाणात वितरण करणे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे फॉर्मुलेशन डेव्हलपमेंट आणि क्वालिटी इव्हॅल्युएशन मध्ये योग्य व पुनरुत्पादनीय एक्स्ट्रुडेबिलिटी मोजमापाला महत्त्व आहे. या नाविन्यपूर्ण रचनेचे संशोधक म्हणून खालील नावे नोंदविण्यात आली आहेत. स्वेरीच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील डॉ. वृणाल विश्वासराव मोरे, डॉ. मिथुन गोपिकिशन मणियार, डॉ. प्राजक्ता कैलास खुळे, कु. प्रणिता पांडुरंग शिंदे तसेच संस्थेचे संस्थापक डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या उल्लेखनीय संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्थ, सर्व संचालक मंडळ व कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ व डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.एस. व्ही. मांडवे, लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. बनकर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

0 Comments