कोर्टी-पंढरपूर: न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक), कोर्टी-पंढरपूर येथील यांत्रिकी विभागातर्फे ऑटोकॅड, कटिया व्ही५ आणि बेसिक अँसिस या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा झाली. एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या सहकार्याने व मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन) च्या वतीने आयोजित या कार्यशाळेत २डी ड्राफ्टिंग, ३डी मॉडेलिंग व असेंब्ली आणि मूलभूत स्ट्रक्चरल अॅनालिसिस या तीन महत्त्वाच्या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
ऑटोकॅडचे मार्गदर्शन प्रा. एच. एस. देशपांडे यांनी, तर कटिया व अँसिसचे मार्गदर्शन प्रा. यू. एस. गोलप यांनी केले. दोन्ही तज्ज्ञ एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील आहेत. संगणकावर प्रत्यक्ष काम करत विद्यार्थ्यांनी आरेखन, त्रिमितीय संरचना निर्मिती आणि ताण-विश्लेषणाची (इक्विव्हॅलंट स्ट्रेस) मूलभूत तंत्रे आत्मसात केली.
आजच्या औद्योगिक क्षेत्रात डिझाइन व सिम्युलेशन सॉफ्टवेअरचे ज्ञान अत्यंत आवश्यक ठरत आहे. त्यामुळे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी व रोजगारक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि अनेक शंकांचे निरसन करून घेतले. "लर्न | डिझाईन | बिल्ड" या मेसाच्या ब्रीदवाक्याला साजेसा हा उपक्रम ठरला. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी यांत्रिकी विभागातील सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.
या उपक्रमाबद्दल बोलताना प्राचार्य विक्रम लोंढे म्हणाले, "उद्योगक्षेत्रात ऑटोकॅड, कटिया व अँसिसचे प्रत्यक्ष ज्ञान आवश्यक आहे. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य व रोजगारक्षमता वाढते. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या गोष्टींचा नियमित सराव करावा. भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील."

0 Comments