पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहर आणि तालुक्यात वाळू तस्करी आणि सर्व प्रकारचे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. याला तालुक्यातील प्रशासनाचीही साथ आहे. तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत ,या मागणीसाठी भाजपाचे माजी पदाधिकारी महादेव खिलारे यांनी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आरंभले आहे. यामुळे तालुका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील अवैध धंदे आणि वाळूतस्करी बंद करण्यासाठी महादेव खिलारे यांनी यापूर्वीही निवेदने देऊन, तक्रारी अर्जही केले होते. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषणही केले होते. या विषयाबाबत संबंधित अधिकारी वर्ग कारवाई केल्याचा दिखावा करीत आहे. याचवेळी अवैध धंदेवाल्यांना अंगावर सोडून पोलीस केसेस करावयास लावत आहेत. याबाबत महादेव खिलारे हे आक्रमक झाले असून, त्यांनी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आरंभले आहे.
वाळू तस्करीबाबत येथील महसूल विभागच मिलीभगत करत असून, येथील वाळू तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही. मुरूम तस्करीही जोमाने सुरू आहे. याचवेळी पोलीस अधिकारीही वाळू तस्करांना साथ देत असल्याचे उघड झाले आहे. पंढरपूर तालुक्यात वाळूतस्करी शिवाय अवैध विटभट्टी, तंबाखूजन्य पदार्थ विक्री, माव्याचे स्टॉल इत्यादी अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. येथील पोलीस आणि महसूल प्रशासनाची साथ असल्याशिवाय हे शक्य नाही. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील प्रशासनाचा चाललेला नंगानाच थांबवावा, आणि येथील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, अशी मागणी भाजपाचे मा. पदाधिकारी महादेव वसंत खिलारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी पंढरपूर, यांच्यासह पंढरपूर तालुक्यातील प्रशासनास निवेदने दिली आहेत.
चौकट
*प्रशासनाचा नंगानाच थांबवा*
पंढरपूर तालुक्यातील अवैध धंदे आणि वाळू तस्करी ज्यांच्या जीवावर सुरू आहे. ते महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांची तालुक्यात मनमानी सुरू आहे. अवैध धंदे बंद करून प्रशासनाची मनमानी थांबवण्यात यावी, अशी मागणी करीत भाजपाचे कार्यकर्ते महादेव वसंत खिलारे यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.


0 Comments