पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम अभंग राव यांचे दीर्घ आजाराने मनीषा नगर येथील राहत्या घरी सोमवार दिनांक ५ जून रोजी सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. पंढरपूर येथे इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये पत्रकारिता करणारे उत्तम अभांगराव हे पहिले पत्रकार होते.२००० साली झी मराठी न्यूज (अल्फा) या बातमी वाहिनीचे ते सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते.
याचप्रमाणे विविध दैनिक, वृत्तपत्रात त्यांनी दर्जेदार लिखाण केले होते.एक निर्भिड,पुरोगामी विचारसरणीचा पत्रकार अशी त्यांची ओळख होती. आषाढी वारी काळात विविध त्रुटी, अभाव या सर्वाचे मार्मिक वृत्तांकन करून प्रशासनास जागे करण्याचे काम त्यांनी केले. काही वर्षांपूर्वी त्यांचा दुर्दैवी कार अपघात झाला. पण या अतिशय कठीण काळावर मात करीत उत्तम अभंगराव पुन्हा डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करीत होते.
एक उत्तम वाचक, स्तंभलेखक विविध विषयांची माहिती असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व असे ते होते. पंढरी मधील गुन्हेगारी क्षेत्रांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले,एक भाऊ असा परिवार आहे. मंगळवार दिनांक ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


0 Comments