पंढरपूर (प्रतिनिधी)भरघाव वेगातील दुचाकी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिला रजनी अनिल गुंडेवार यांना धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पंढरपूर येथील सुप्रसिध्द सिमेंट डीलर बालाजी गुंडेवार यांच्या त्या मातोश्री होत.
हा दुर्दैवी अपघात गणेशनगर परिसरात आज मंगळवार दि.२५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता घडला.
रजनी अनिल गुंडेवार (वय – ७४ रा. टाकळी रोड,पंढरपूर ) या रोजच्या नित्यक्रमानुसार आज सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने चालत असताना अचानक पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात तो दुचाकीस्वार देखील वेगात खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.
रजनी गुंडेवार यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नागरिकांनी दाखल केले. पण त्या आधीच मृत झाल्या असल्याचे सांगण्यात आले.
गणेशनगर कडून टाकळीकडे जाणार रस्ता सिमेंटकाँक्रिट ने बनविला आहे. यामुळे दुचाकी स्वार बेफाम वेगाने जात असतात. अनेक अल्पवयीन मुले लायसन नसतानाही गाड्या चालवीत आहेत.
पूर्वी वेग नियंत्रित करण्यासाठी या परिसरात गतीरोधक बसविण्यात आले होते. पण नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे ते काढून टाकण्यात आले.
केवळ ६ महिन्यांपूर्वीच पती अनिल यांचा मृत्यू झाला होता.
पंढरपूर येथील नामांकित बाल रोगतज्ञ विवेक गुंडेवार यांच्या त्या मोठ्या वहिनी होत्या.

0 Comments