लहानपणी आमची आई गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आम्हाला पिसोळा आणण्यासाठी पाठवत असे।
लहानपणापासून पाडव्याच्या भल्या पहाटे पिसोळा पायाखाली घेऊन स्नान करण्याची रीत आम्हाला माहिती झाली, आम्ही अजूनही ती पाळतो।
आमच्या लातूरमध्ये तर पिसोळा विकतही मिळतो।
पिसोळा म्हटलं की एक उग्र गंधी हिरव्या रंगाचे छोटेसे क्षुप। साधारणतः दीड दोन फूट उंचीचे।
शेतात आपोआप उगवणारे हे क्षुप।
अतिशय औषधी गुणधर्माने युक्त असते।
याच्या उग्र गंधामुळे कृमी पळून जातात। गुढीपाडव्याच्या काळात शरीरामध्ये ऋतुसंधी काळामुळे कफ पित्त वाढून अनेक प्रकारचे व्याधी उद्भवू शकतात।
अशा कफ पित्त ज्वरामध्ये पिसोळा अतिशय उत्तम काम करून ज्वरनाशनाचे काम करतो। तसेच तो मूत्रलही आहे। तो मृदूरेचक ही सांगितला आहे।
याला आयुर्वेदामध्ये क्षीरीनी असं म्हटलं गेलं आहे। दासबोधामध्ये रामदास स्वामींनी ही याचा उल्लेख केला आहे ।
पिसू नावाचे लहान कीटक पूर्वी घरात होत होते ते चावून अनेक प्रकारचे त्वचा विकार लोकांना होत असत। पिसोळ्यामुळे ते पिसू नष्ट होत। पर्यायाने त्वचा विकारापासून मुक्ती मिळत असे।
पिसोळा पायाखाली धरल्यामुळे व अंगावर गरम पाणी टाकल्यानंतर पिसोळ्यातील उग्रतत्व (volatile oil's) निघून ते त्वचेवर पर्यायाने श्वासावाटे शरीरामध्ये जात असावेत आणि रेचनाचे काम होऊन शरीराचे शुद्धीकरण होत असावे असा एक कयास आहे।
म्हणून असा हा बहुगुणी पिसोळा।।
आपण आपले सण त्यामागील उद्देश, शास्त्रीय महत्त्व समजून घेतले तर त्या सणाचा गोडवा अजून जास्त वाढेल...आपलाच आरोग्याभिलाशी
वैद्य दत्तात्रय दगडगावे,
लातूर।।


0 Comments