LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री पहिल्यांदाच पंढरीत आले अन् येथील अनेक समस्या न पाहताच गेले - गणेश अंकुशराव



पंढरपूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज पहिल्यांदाच पंढरपुरात आले, विठ्ठलाच्या चरणी लीन झाले, पण पंढरपूर शहरातील अनेक समस्या जाणून न घेताच परत गेले अशी प्रतिक्रिया पंढरपूर येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.

पंढरपूर शहर हे भुवैकूंठ म्हणून ओळखले जाते, लाखो भाविकांचे हे श्रध्दास्थान आहे. परंतु या भुवैकूंठ नगरीत अनेक समस्या सुध्दा आहेत, अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्नही आहेत. याकडं आजतागायत शासनाने दुर्लक्ष केलंय. विधानसभा निवडणुकीनंतर नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार व नुकतेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त झालेले जयकुमार गोरे हे येथील प्रश्न आणि समस्या जाणून घेतील व ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. 

आज पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूर दौऱ्यावर होते येथे आल्यानंतर ते आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रूग्णालयाची (उपजिल्हा रुग्णालय) पाहणी करतील, येथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, शौचालयाला कुलपं आहेत त्यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य आहे, रूग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत याबाबत पालकमंत्री पाहणी करतील अशी अपेक्षा होती, परंतु पालकमंत्री इकडे फिरकलेच नाहीत, श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर जतन संवर्धन काम संपुर्ण मंदिर फिरुन बारकाईने पाहणी करतील व निकृष्ट काम पाहतील तसेच विठ्ठल मंदिरात चाललेल्या भोंगळ कारभाराबाबत ही पालकमंत्री माहिती घेतील अशी अपेक्षा होती परंतु ती सुध्दा फोल ठरली, चंद्रभागा वाळवंटात येऊन नदीपात्रात वाळु चोरीमुळे पडलेले खड्डे पाहतील असेही वाटले होते परंतु चंद्रभागा पात्राकडेही पालकमंत्री फिरकलेच नाहीत. 

पंढरीत आलेल्या प्रत्येक मंत्र्यांनी वरील सर्व बाबींची पाहणी केली तरच शासनाचा वचक येथील प्रशासकीय यंत्रणेवर राहील अन्यथा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे पंढरीच्या प्रशासनाचा ढिसाळ कारभार वर्षानुवर्षे जसा होता तसाच राहील, शहरातील धुळीचं साम्राज्य, रस्त्यांवरील खड्डे, घाणीच साम्राज्य हे सारं सारं पाहून खरंतर पांडुरंगानेच आता कामचुकार करणा-या गलथान कारभा-यांना दृष्टांत देऊन जागं करावं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशी उद्विग्न प्रतिक्रिया गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.

........................

मा. संपादक, पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, युट्यूब न्युज चॅनल, वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
- आपला गणेश अंकुशराव 
- 9370271730

Post a Comment

0 Comments