प्रतिनिधी-सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासात्मक प्रश्नांवर आवाज उठवत लवकरात-लवकर योग्य ती कार्यवाही करुन जनतेच्या प्रश्नांचा निपटारा करण्याची मागणी केली असता मतदार संघातील सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री नामदार गोरे यांनी यावेळी दिली.
मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरु असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये वाढ करुन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही समावेश करावा जेणेकरून जनावरांनाही पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर दिले जातात परंतु अधिकारी-ठेकेदार संगनमताने ते ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी पैसे घेतात यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे.
मंगळवेढा टेल अंतर्गत १.२७ टीएमसी पाणी मंजूर असूनसुद्धा केवळ ०.२७ इतकेच पाणी मंगळवेढा तालुक्यासाठी मिळते. सदर पाणी येत असताना वरील तालुक्यातील शेतकरी पाणी अडवून कॅनॉल फोडून पाणी घेतात. सदर बाबतीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठकीत पाठपुरावा करुन व आवाज उठवूनसुद्धा हे पाणी मिळत नसल्याची तक्रार आमदार महोदय यांनी यावेळी मांडून लवकरात लवकर हे पाणी दिले जावे अशी मागणी लावून धरली.
तसेच टेल टू टेल पाणी वाटप कलम१४४ चा अवलंब करुन हे पाणी मंगळवेढा तालुक्यासाठी उपलब्ध करुन द्यावे असे पालकमंत्री ना.गोरे साहेब यांनी आदेशीत केले आहे. त्याचबरोबर म्हैसाळ पाणी वाटप योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांना आवश्यक दाबाने योग्य ते पाणी मिळवण्याची तरतूद लवकरात लवकर करण्यात यावी.
आरटीओ खात्यांतर्गत स्थानिक वाहने व शेतकऱ्यांच्या वाहनांवर दंड आकारण्यात येऊ नये. टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील धरणे भरून मिळावीत. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील पंढरपूर आणि मंगळवेढा येथील जवळपास दोन हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवूनही मंजूर नाहीत सध्या पेरणी काळ सुरु असल्यामुळे ते तात्काळ मंजूर करुन संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेचा निधी मिळावा अशी मागणी केली. आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजने ची काम पूर्ण होत आले आहे परंतु महावितरण आणि एमजीपी यांच्यात समन्वय नसल्यामुळे लोकांना अजूनही पाण्यापासून वंचित राहू लागत आहे.
सर्वसामान्यांची कामं आणि जिल्ह्याचा सर्वांगीण होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लवकर मार्गी लावावीत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी खासदार, जिल्ह्यातील आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी, कार्यकारी मुख्य अधिकारी, नियोजन अधिकाऱ्यांसह प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments